नवी दिल्ली : 22 वर्षीय राधिका तन्वरची (Radhika Tanwar) 5 मार्च 2011 रोजी दक्षिण दिल्लीतील ब्रिजवर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. राधिकाच्या हत्येप्रकरणी विजय उर्फ राम सिंग याला मुंबईतून अटक करण्यात आली होती. अनेक दिवसांच्या पाठलागानंतर विजयने तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं होतं.
काय आहे प्रकरण?
दक्षिण दिल्लीतील धौला कुआं परिसरात राम लाल आनंद कॉलेजच्या बाहेर सकाळच्या वेळी तिच्यावर हा हल्ला झाला होता. विजयने त्याआधीही अनेक वेळा राधिकाचा पाठलाग केला होता, असं पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. हत्येच्या तीन दिवस आधी त्याने राधिकाशी त्याच फूट ओव्हर ब्रिजवर बोलण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र तिथे जे घडलं, त्यामुळेच तिला जीवे ठार मारण्याची योजना विजयच्या डोक्यात शिजू लागली, असा दावा पोलिसांनी केला होता.
हत्येच्या आधी काय घडलं होतं?
5 मार्च रोजी विजय राधिकाला त्याच पुलावर भेटला होता. जेव्हा त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्याचा पाणउतारा केला” असं दिल्लीचे तत्कालीन पोलिस आयुक्त बी के गुप्ता म्हणाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, विजयच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याने गुरुग्राममधून एक बंदूक विकत घेतली. जिथे फूट ओव्हर ब्रिजचा रॅम्प संपतो, तिथेच तिच्यावर गोळी झाडण्याचा निर्णय त्याने घेतला, जेणेकरून घटनास्थळावरुन त्याने वेगाने पळ काढता येणे शक्य होणार होते.
ठरल्यानुसार, सकाळच्या वेळेस विजयने राधिकावर गोळी झाडली. कोणी त्याला पकडण्याच्या आधी तो घटनास्थळावरुन बंदुकीसह पसार झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राधिका तन्वरच्या मदतीला जवळपास दहा मिनिटं कोणीही आलं नव्हतं. अखेर राधिकाला प्राण गमवावे लागले.
छेडछाड करणाऱ्या विजयने मारही खाल्लाय
विजय राधिकाच्या घराजवळ विणकाम करायचा. त्या परिसरातील तरुण मुलींची तो छेडछाड करत असल्याचंही समोर आलं. याबद्दल दोन वेळा त्याने मारही खाल्ला होता. तीन वर्षांपूर्वी तो मुंबईला स्थायिक झाला. मात्र तो वारंवार दिल्लीला यायचा आणि प्रत्येक वेळी राधिकाचा पाठलागही करायचा. पहिल्यांदाच धीर एकवटून बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर राधिकाने केलेली अवहेलना त्याच्या जिव्हारी लागली आणि त्याच संतापातून तो तिच्या जीवावर उठला.
संबंधित बातम्या :
स्कार्फमुळे गोंधळ, नागपूरच्या मोनिका किरणापुरेची 2011 मध्ये गैरसमजातून झालेली हत्या