नवी दिल्ली : पतीची हत्या (Husband Murder) केल्याच्या आरोपाखाली राजधानी दिल्लीत पोलिसांनी (Delhi Crime News) पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 32 वर्षीय स्वर्णाली घोष आणि तिचा 35 वर्षीय बॉयफ्रेण्ड मोहनपाल उर्फ शंटून यांना हत्या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महिलेचा पती अर्जुन घोष याची दोघांनी हत्या केल्याचा आरोप आहे. विवाहबाह्य संबंधातून महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचं (Extra Marital Affair) समोर आलं आहे. हे प्रकरण दिल्लीतील कालकाजी भागातील आहे.
अर्जुन घोष याचा मृतदेह त्याच्या घरातील बेडवर पडलेला आढळून आला होता. त्याच्या मानेवर खुणा होत्या, त्यावरुन धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यांना अर्जुनच्या पत्नीवर संशय आला. मृताच्या पत्नीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.
आरोपी पत्नी स्वर्णालीने सांगितले की, तिने तिच्या प्रियकरासह पती अर्जुनची हत्या केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेचा प्रियकर मोहनपाल याचा माग काढला आणि साकेत मॉलजवळून त्याला अटक केली. पोलिस उपायुक्त ईशा पांडे यांनी सांगितले की, आरोपी मोहनलाल पश्चिम बंगालमधील सिलीगुडीला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तो पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी स्वर्णालीने सांगितले की, तिचा पती अर्जुन तिला खूप मारायचा. त्याच्या या अत्याचाराला ती कंटाळली होती. दोन वर्षांपूर्वी तिची मोहनलालशी भेट झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अफेअर सुरू झाले.
स्वर्णालीने पुढे सांगितले की, तिला मोहनलालसोबत राहायचे आहे. त्यामुळे दोघांनी मिळून अर्जुनला मारण्याचा कट रचला. त्यानंतर दोघांनी मिळून अर्जुनचा चाकूने गळा चिरून खून केला. नंतर मोहनलालने खुनात वापरलेला चाकू आणि रक्ताने माखलेले कपडे नाल्यात फेकून दिले