Delhi : सडलेल्या अवस्थेत सूटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह! दिल्ली पुन्हा हादरली
मृतदेह इतका कुजलाय की तो कुणाचाय? याची ओळख पटवणंही पोलिसांसमोर आव्हान
दिल्ली : दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. पश्चिम दिल्लीमध्ये एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुणाचा आहे? याची ओळख पटवणं देखील पोलिसांसमोर आव्हान आहे. कारण सुटकेसमध्ये आढळलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. आठ ते दहा दिवसांपूर्वी मृत तरुणीची हत्या करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. याप्रकरणाचं गूढ उकलण्याचं आव्हान दिल्ली पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग परिसरात दुर्गंध पसरला होता. त्यामुळे शंका उपस्थित केली जात होती. अखेर एका संशयास्पद सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये एक सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. हा मृतदेह एका तरुणीचा होता. या युवतीच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकरणाचे जखमांचे निशाणा नसल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.
पंजाबी बाग परिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुर्गंध कुठून पसरतोय, याचा तपास केला असता संशयास्पद सुटकेस आढळून आली. आता या सुटकेसमधील मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पुढे पाठवण्यात येणार आहे.
सध्या हा मृतदेह शवाघरात ठेवण्यात आला आहे. अद्यापही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मात्र पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला तेथील स्थानिक यांच्याकडून माहिती गोळा करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय.
पोस्टमॉर्टेम केल्यानंतर या तरुणीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, हे स्पष्ट होईल. सध्या दिल्ली पोलिसांनी या मृतदेह प्रकरमी कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास केला जातोय. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड, आयुषी हत्याकांड या दोन हत्येच्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा दिल्लीत समोर आलेल्या या खळबळजनक घटनेनं सगळेच हादरलेत.