नवी दिल्ली : प्रेयसी लग्नासाठी तगादा लावत होती म्हणून प्रियकराने बहिणीच्या मदतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह 12 किमी दूर फेकला. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी तरुणीचा प्रियकर आणि त्याचा मित्र फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पारुल असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपी प्रियकर विनित आधीच एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सहा महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केली.
आरोपी विनीत आणि मयत रोहिना नाज दोघेही गेल्या सहा वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. रोहिना विनितवर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र रोहिना आणि विनीत वेगवेगळ्या समाजाचे असल्याने विनितचे घरचे त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. यामुळे विनीत रोहिनासोबत लग्न करायला तयार नव्हता. मात्र रोहिनाच्या दबावाला कंटाळून रोहिनाने बहिण पारुलश संगनमत करुन रोहिनाचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी 12 एप्रिल रोजी रोहिनाची हत्या केली.
हत्या केल्यानंतर मृतदेह 12 किमी दूर नेऊन फेकला. बुधवारी रात्री एका घराबाहेर एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती करवल नगर पोलिसांना मिळाली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर करवल नगर पोलिसांनी हत्येचा एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.
दिल्ली पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच पथकं तयार केली. घटनास्थळाच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एका सीसीटीव्हीत दोन तरुण एका महिलेचा मृतदेह बाईकवरुन घेऊ जात रस्त्यावर फेकून पळाल्याचे दिसले. तसेच दुसऱ्या एका सीसीटीव्हीत एक तरुण मृतदेह खांद्यावर घेऊन जात होता आणि त्याच्या मागे एक तरुणी चालली होती. पोलिसांनी या दोघांबाबत तपास केला असता त्यांची ओळख पटली.
पोलीस विनित आणि पारुलच्या घरी पोहचले असता त्यांनी ते घर सोडल्याचे पोलिसांना कळले. पारुल दुसऱ्या घरी शिफ्ट झाली असून, घोटागाडीतून सामान घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी या घोडागाडीचा शोध घेतला असता पारुल पोलिसांच्या तावडीत सापडली. पारुलने हत्याकांडात सहभागी असल्याची कबुली दिली. मात्र विनित आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र फरार आहेत. पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत.