पालघर : डहाणू (DAHANU CRIME NEWS) तालुक्यातील निकावली (NIKAWALI VILLAGE) गावाच्या हद्दीत धुलिवंदनच्या दिवशी दारू पिताना दोन मित्रांमध्ये वाद होऊन अभिजित मोरे याने शिवराज खरतोडे याला धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. रक्तस्त्राव अधिक झाल्याने शिवराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी (VASAI POLICE) दिली आहे. आरोपी अभिजित मोरे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला लवकरचं न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदर घटनेबाबत रोहित हजारे यांनी कासा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, पालघर, अनिल विभुते पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, कासा पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. सदर पथकांपैकी पोउपनि सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर या पथकाने तांत्रीक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसतांना सखोल व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी वय ४० वर्षे, रा . पवारवाडी, ता . फलटण जि . सातारा यास वसई येथुन ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपी याने खून केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पवारवाडी गावचा आहे. घटना घडल्यानंतर तो फरारी झाला होता. विविध पथकं आरोपीचा शोध घेत होती. परंतु तांत्रिक गोष्टींच्या आधारे आरोपीला शोध लागला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्या दिवशी झालेला सगळा प्रकार आरोपीने पोलिसांना सांगितला आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शिवराज खरतोडे याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.