कुठे दागिने पळवले तर कुठे मोबाईल… राज्यात कुठे कुठे चोऱ्यामाऱ्या ?
राज्यभरातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कुठे लाखोंचे दागिन पळवले तर कुठे मोबाईलच लंपास केला. राज्यभरात गेल्या काही दिवसांत चोरी-मारीच्या घटना घडल्याचे समोर आले.
Marashtra Crime : राज्यभरातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कुठे लाखोंचे दागिन पळवले तर कुठे मोबाईलच लंपास केला. राज्यभरात गेल्या काही दिवसांत चोरी-मारीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांची वाढती गस्त, कडक बंदोबस्त असूनही चोरट्यांनी शक्कल लढवत लूटमार केली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा तपास सुरू आहे. राज्यात कुठे काय घडलं, ते सविस्तर जाणून घेऊया.
नांदेडमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दागिन्यांची बॅग पळवली
चोरीची पहिली घटना ही नांदेड शहरात घडली आहे. नांदेड शहराजवळ असलेल्या सिडको येथील सराफा बाजारातून भरदिवसा लाखोंची चोरी झाली आहे. चोरट्यांनी भरदिवसा पाच लाखांचे दागिने असलेली बॅग पळवल्याने एकच खळबळ उडाली. सराफा बाजारातील श्री तुळजाई ज्वेलर्स या दुकानात ही चोरी झाली .
या ज्वेलर्सचे मालक असलेले शिवाजी डहाळे यांनी त्यांच्या कारमधील दागिन्यांची बॅग दुकानात ठेवली आणि गाडी पार्क करण्यासाठी ते पुन्हा गाडीत बसले. मात्र तीच संधी साधून एक चोरटा त्याच वेळी दुकानात शिरला. बॅग घेऊन तो बाहेर आला . त्याचा दुसरा साथीदार बाईक घेऊन तयारच होता. पहिला चोर दागिन्यांची बॅग घेऊन बाईकवर बसला आणि दोघेही वायूवेगाने बाईकवरून पसार झाले. चोरी जाल्याचे लक्षात येताच डहाळे यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत चोरांचा पाठलाग करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत चोरटे दागिन्यांसह पसार झाले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे.
उल्हासनगरामध्ये मोबाईल चोराला सापळा रचून अटक
दरम्यान उल्हासनगर शहरात पोलिसांनी सापळा रचून एका मोबाईल चोराला अटक केली आहे. त्याने मोबाईल चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली असून आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. उल्हासनगर कॅम्प ५ मधील न्यू गंगा ऑटोमोबाईल या पेट्रोल पंपावर दोन तरुण हे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मात्र त्या पेट्रोल पंपावर काम करणारा घनश्याम जैस्वानी या कर्मचाऱ्याचा मोबाईल त्या दोन चोरट्यांनी हिसकावला आणि तेथून पोबारा केला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या चोरट्यांचा शोध सुरू करत. अखेर सापळा रचून पोलिसांनी पवन यादव या एका आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. मात्र त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून त्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.