नो एन्ट्रीमध्ये गाडी घातली म्हणून गाडी अडवली, मग भररस्त्यात आयकर उपायुक्त आणि वाहतूक पोलिसात जुंपली !
वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी आयकर उपायुक्तांनी नो एन्ट्रीमध्ये गाडी घातली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपायुक्तांची गाडी अडवली. यानंतर भररस्त्यात एकच गोंधळ उडाला.
कल्याण : नो एन्ट्रीमध्ये गाडी घातली म्हणून अडवून लायसन्स विचारल्याने भररस्त्यात आयकर उपायुक्त आणि वाहतूक पोलिसात जुंपल्याची घटना कल्याण स्टेशन परिसरात घडली. या प्रकरणावरुन तब्बल एक तास रस्त्यात गोंधळ सुरु होता. याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारुन आयकर उपायुक्ताविरोधात कारवाईचा रिपोर्ट पाठवला आहे. तर आयकर उपायुक्तानेही उद्धट बोलल्याचा आरोप करत वाहतूक पोलिसाविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाकडून फुले चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता वन वे केला आहे. याच रस्त्याने आयकर विभागाचे उपायुक्त धिरेन कुमार नो एन्ट्रीमधून आपली गाडी घेऊन येत होते. यावेळी कल्याण स्टेशनला दीपक हॉटेलजवळ कार्यरत असलेल्या डी. बी. पुंड नावाचे वाहतूक पोलीस यांनी त्यांना अडवली. पुंड यांनी धिरेन कुमार यांच्याकडे लायसन्स आणि गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. यामुळे चिडलेल्या धिरेन कुमार यांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्यास सुरवात केली.
एक तास सुरु होता गोंधळ
वाहतूक पोलीस आणि आयकर उपायुक्तांचा हा गोंधळ स्टेशन परिसरात तब्बल एक तास सुरू होता. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी मध्यस्थीर करून रस्त्याचा वाद मिटवला. मात्र त्यानंतर वाहतूक पोलीस पुंड यांनी उपायुक्तांच्या गाडीवर दीड हजाराचा दंड लावत, त्यांच्या विरोधात रिपोट बनवत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाई मागणी केली आहे.
दुसरीकडे, आयकर उपायुक्तांनी या विषयावर बोलणं टाळत वाहतूक पोलिसांनी उद्धट भाषा वापरल्याने हा वाद झाला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी लेखी तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र कायद्याचे रक्षण करणारेच अशा प्रकारे भररस्त्यात भांडत असल्याने सर्वसामान्य व्यक्तीला कायद्याचा धाक राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.