‘मुन्नाभाई डॉक्टर’चा प्रताप ! YouTube वर व्हिडीओ पाहून ऑपरेशन केलं, अंगाशी आलं..15 वर्षांच्या मुलाचा हकनाक गेला जीव
बिहारमधील सारणमध्ये, उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेलेल्या मुलाचा ऑपरेशननंतर मृत्यू झाला. हामोबाईलवर यूट्यूब पाहून डॉक्टरांनी ऑपरेशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र ते ऑपरेशन अंगाशी आलं. त्यानंतर मुलाचा जीव गेला.
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका कथित डॉक्टरने चक्क यूट्यूब पाहून 15 वर्षांच्या मुलाचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्याचं सतत पोट दुखत होतं आणि उलट्याही होत होत्या. डॉक्टरने ऑपरेशन केल्यानंतर त्या मुलाची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कथित डॉक्टरने कुटुंबियांची परवानगी न घेताच रुग्णाचे ऑपरेशन केल्याचेही समोर आले आहे. मढौरा ठाणे क्षेत्रातील धर्मबागी येथील गणपती सेवा सदनच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. मुलाच्या मृ्त्यमुळे कुटुबियांवर सोककळा पसरली असून ते अतिशय संतप्त, आक्रमक झाले होते. तर ऑपरेशन असफल ठरून मुलाचे प्राण गेल्यानंतर तो डॉक्टर आणि त्याचे साथीदार फरार झाले होते. अखेर पोलिसांनी कसून शोध घेत त्यांना अटक केली.
पोट दुखतं म्हणून डॉक्टरांकडे गेला तो परत आलाच नाही
मिळालेल्या माहितीनुार, गोलू (वय 15) असे मृत मुलाचे नाव असून तो भुवालपुर या गावचा रहिवासी होता. त्याचं सतत पोट दुखत होतं आणि उलट्याही होत होत्या. अखेर त्याचे वडील चंदन हे त्याला उपचारांसाठी गणपती सेवा सदन रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र हे हॉस्पिटल चालवणारा कथित डॉक्टर अजीत कुमार पुरीने कुटुंबियांना न सांगताच गोलूचे ऑपरेशन केले, असा आरोप लावण्यात आला आहे.
ऑपरेशन दरम्यान गोलूची तब्येत आणखी खालावली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मोबाईलवर यूट्यूब पाहून डॉक्टरांनी ऑपरेशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गोलूवर शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरांनी रुग्णाच्या वडिलांना कंपाउंडरसोबत डिझेल आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी रुग्णालयात फक्त रुग्णाचे आजोबा प्रल्हाद आणि आजी होते. ऑपरेशननंतर गोलूची तब्येत आणखी खालावली. त्याच्या आजोबांनी डॉक्टरांना याबाबत विचारले असता मी डॉक्टर आहे की तुम्ही? असा अरेरावीचा प्रश्न विचारत त्याने थेट उत्तर देण्यास नकार दिला.
पाटण्यातील रुग्णालयात नेताना मृत्यू
ऑपरेशन दरम्यान मुलाची तब्येत बिघडल्यावर डॉक्टरांनी स्वतः रुग्णाला आणि त्याच्या आजीला रुग्णवाहिकेतून पाटणा रुग्णालयात नेलं. मात्र पाटण्याला पोहोचण्याआधीच वाटेतच त्या मुलाचा मृत्यू झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलाचा जीव गेल्यानंतर त्या कथित डॉक्टराने तो मृतदेह मागे टाकला आणि बॅग घेऊन फरार झाला. तिथून त्याची आजी कशीबशी नातवाचा मृतदेह घेऊन परतली. अवघ्या 15 वर्षांच्या गोलूच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनाही याप्रकरणाची माहिती देण्यात आली. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरचा शोध सुरू केला. अखेर आज, पोलिसांनी फरार डॉक्टर अजित कुमार याला अटक केली आहे. गोलूच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.