लखनौ : जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच 41 वर्षीय डॉक्टरला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली आहे. संजीव पाल असे मयत डॉक्टरचे नाव आहे. ही घटना जिममधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बाराबंकी येथील एका रुग्णालयात संजीव पाल कार्यरत होते. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सत्य उघड होईल.
विकासनगर येथे डॉ. संजीव पाल आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. बाराबंकी येथील एका रुग्णालयात डॉ. पाल कार्यरत होते. डॉ. पाल नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी विकासनगर येथील जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेले होते.
वर्कआऊट करत असतानाच डॉ. पाल अचानक खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. जिममधील लोकांनी त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक तपासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. डॉक्टरच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जिममध्ये वर्कआऊट करताना हॉटेल संचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. प्रदीप रघुवंशी असे मयत हॉटेल संचालकाचे नाव आहे. रघुवंशी यांना जिममध्ये व्यायाम करताना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.