दुसऱ्याच्या मदतीने पहिल्याचा काटा काढला, मग पळून जायच्या तयारीत होती इतक्यात…
त्या दोघे चार वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. पण वर्षभरापूर्वी दोघात तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् नात्यात ठिणगी पडली. अखेर या ठिणगीने भडकाच उडवून दिला.
डोंबिवली / सुनील जाधव : सांस्कृतिक शहर असलेल्या डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळले. लिव्ह इन पार्टनरला याची कुणकुण लागताच त्यांच्यात वाद होऊ लागले. या वादातून महिलेने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्याचा काटा काढला. यानंतर पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण घरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी महिलेला अटक केली. तर आधीच पळून गेलेल्या तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली. संध्या सिंह आणि गुड्डू शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पळून जाण्याच्या तयारीत असतानाच महिलेला पकडले
पोलिसांना महिलेच्या जबाबावर संशय आला. यामुळे पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघांवरिोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मारुती हांडे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
काय आहे प्रकरण?
संध्या सिंह आणि मारुती हांडे गेल्या चार वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यादरम्यान संध्याची परिसरातच राहणाऱ्या गुड्डू शेट्टीशी ओळख झाली. यानंतर गेल्या वर्षभरापासून संध्या आणि गुड्डूमध्ये प्रेम प्रकरण सुरु आहे. मारुतीला याची माहिती मिळाल्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागला.
याच वादातून गुड्डूने रविवारी घरात घुसून मारुतीच्या डोक्यात बॅट घालून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर गुड्डू तेथून पसार झाला. जखमी अवस्थेत संध्या आणि शेजारचे लोक मारुतीला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत चौकशी सुरु केली. चौकशीत संध्याने घरात पडून मारुती जखमी झाल्याचा बनाव केला. यानंतर ती घरी आली आणि पळून जाण्याच्या तयारीत होती.
पोलिसांकडून दोघा आरोपींना अटक
पोलिसांना मात्र संध्यावर संशय आला, म्हणून पोलीस तिच्या घरी दाखल झाले आणि संध्याचा डाव फसला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संध्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी पोलिकी खाक्या दाखवताच संध्याने सत्य कथन केले. यानंतर पोलिसांनी गुड्डूचाही कसून शोध घेत त्यालाही ताब्यात घेतले. दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.