Dombivli Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी ? सख्ख्या भावांमध्ये फिल्मी स्टाईलने हाणामारी , जीवघेण्या हल्ल्यामुळे हादरलं शहर
मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 7 नोव्हेंबर 2023 : डोंबिवलीत चोरी, पाकिटमारी या गुन्ह्यांसह दोन गटातील वाद, हाणामारीचीही प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता घरातील वाद चव्हाट्यावर आणत दोन सख्खे भाऊ पक्के वैरी बनून एकमेकांशी वाद घालत असल्याचे दिसले आहे. एवढेच नव्हे तर हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या जीवावरच उठले होते. त्यांनी एकमेकांना लाठा-काठ्यांनी बेदम मारहाण केली. आणि त्यांचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या नातेवाईकांनाही लाठीचा प्रसाद मिळाला.
डोंबिवलीतील पिसवली गावातील ही घटना असून या हल्ल्यात दोघे-तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर व दोन्ही भावांसह अन्य 4 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करत पुढचा तपास सुरू केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
कशावरून झालं भांडण ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील पिसवली गावात आप्पा पन्हाळे आणि कपिल पन्हाळे असे दोन भाऊ एकत्र राहतात. मात्र त्यांच्यात सर्वकाही आलबेल नाही. दोघांच्या कुटुंबामध्य सतत काही ना काही कारणावरून वाद होतच असतात. असाच एक वाद गेल्या महिन्यात 24 तारखेला संध्याकाळच्या सुमारास घरात झाला. नेहमीचं भांडण समजून कोणी एवढं लक्ष दिल नाही. पण थोड्या वेळाने हा वाद इतका टोकाला गेला की ते दोन्ही सख्खे भाऊ कमी आणि वैरीच जास्त वाटत होते. ते एकमेकांच्या जीवावरच उठले. आणि घरात दिसेल, सापडेल त्या वस्तूने, काठी, बांबू घेऊन एकमेकांवर वार करू लागले. त्यांनी एकमेकांवर जीवघेणा हल्लाच केला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन्ही भावांच्या पत्नीने आणि इतर नातेवाईकांनीही हे भांडण मिटवण्याऐवजी एकमेकांना मारहाणच सुरू केली. काही जण भांडण थांबवायला मध्ये पडले, तर त्यांनाही बेदम चोप देण्यात आला. या हल्ल्यामध्ये तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलिस स्टेशनमधील अधिकारी तेथे दाखल झाले. पोलिसांनी चौकशी करून भांडणारे दोन्ही भाऊ व त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.