Dombivli Crime | महिनाभर पाठलाग, फोटो काढून द्यायचा त्रास.. महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या विकृत तरुणाला अखेर ठोकल्या बेड्या
कल्याण-डोंबिवलीमध्ये गुन्हेगारांनी हैदोस घातला असून महिलांविरोधातील गुन्हेही वाढताना दिसत आहेत. शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या विकृत तरूणाला अटक करण्यात आली आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 6 ऑक्टोबर 2023 : डोंबिवली तसेच कल्याणमध्येही गुन्ह्यांच्या (crime cases) घटना कमी होण्याचं नाव घेत नाही. गुन्हेगारांनी अक्षरश: धूमाकूळ माजवला आहे. कल्याणमध्ये नुकताच चोरट्यांनी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आरोपींनी त्या महिलेचे मंगळसूत्रही लांबवल्याचं समोर आलं. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच डोंबिवलीमध्ये (crime in dombivli) अजून एक खळबळजनक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका महिला प्रवाशाचा सतत पाठलाग करत तिचे फोटो काढून छेड काढण्यारा विकृत तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवली रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संजय बोरा असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो पीडित तरूणीला सतत त्रास देत होता, तिची छेडही काढायचा. अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत या विकृत तरूणाला गजाआड धाडलं. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं समजतं.
महिन्याभरापासून देत होता त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला प्रवासी ही उल्हासनगर येथे राहते. ती दररोज लोकलने उल्हासनगर ते डोंबिवली असा प्रवास करते. मात्र गेल्या महिन्याभरापासून संजय बोराचा नावाचा तरूण या महिलेचा सतत पाठलाग करत होता, तिची छेड काढत असे. त्याच्या या रोजच्या त्रासामुळे ती महिला अतिशय वैतागली होती. अखेर तिने याबद्दल तिच्या कुटुंबियांना सांगितले. त्या विकृत तरूणाला धडा शिकवण्यासाठी तिचे कुटुंबीय तिच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. घटनेच्या दिवशी हा तरूणी त्या महिलेला पुन्हा त्रास देत होता, त्याने तिचा फोटोही काढला, तेवढ्यात तिच्या कुटुंबियांनी इतर नागरिकांच्या मदतीने त्याला पकडलं आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपी संजय बोरा याला अटक केली. पोलिसांनी पुढील तपास चालू केला आहे.
महिलेवर अतीप्रसंगाचा प्रयत्न
एका महिलेवर चोरट्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. तसेच आरोपींनी महिलेचं मंगळसूत्रही लंपास केलं. संबंधित प्रकार हा डोंबिवली पूर्वेतील एका टेकडीवर घडला. पीडित महिला ही टेकडीवर असलेल्या देवळात दर्शनासाठी जात होती, तेव्हा आरोपीने तिला अडवून अतिप्रसंग करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. महिलेने यावेळी आरोपीचा प्रचंड प्रतिकार केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या झटापटीत आरोपी संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.