Dombivli Crime : मित्र मस्करीत काळ्या बोलला, संतापलेल्या “भाई”ने जे केलं..
काहीवेळा 'मस्करी ची कुस्करी' होऊ शकते. मस्करीच्या नादात असं काही बोललं जात, जे आपल्याला मजेशीर वाटत पण समोरच्याला नाही. आणि त्या रागातून काहीही घडू शकतं
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 17 नोव्हेंबर 2023 : मित्रा-मित्रांमध्ये मस्करी तर चालतेच. एक-दुसऱ्याला छळल्याशिवाय मित्रांना जेवण पचतच नाही. पण काहीवेळा ‘मस्करी ची कुस्करी’ होऊ शकते. मस्करीच्या नादात असं काही बोललं जात, जे आपल्याला मजेशीर वाटत पण समोरच्याला नाही. आणि त्याचा राग आला तर मग काहीही घडू शकतं. अशाच एका मित्राला मस्करी करणं खूप महागात पडलं. डोंबिवलीत ही घटना घडली.
मित्र मस्करीत काळ्या बोलला, पण याचा एका भाईला इतका राग आला की त्याने त्या मित्रालाच बेदम मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्याने त्या मित्राला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडची सगळी रोकड हिसकावत लुटलं आणि तो पसार झाला. डोंबिवली पूर्वेतील चिमणी गल्लीत हा सगळा प्रकार घडल्याने खळबळ माजली. मात्र याची तक्रा दाखल झाल्यावर क्राईम ब्रँच पोलिसांनी या भाईसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकून अटक केली. अक्षय उर्फ सोनू दाते असे मारहाण करणाऱ्या भाईचे नाव आहे. सोनू हा एक सराईत गुन्हेगार असून तो ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार आहे .
तो चहा प्यायला गेला होता, पण मार खाऊन आला
डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्ली परिसरात हर्षद सरवदे हे चहा पीत होते. तेव्हाच तिकडे अक्षय उर्फ सोनू दाते व त्याचे दोन साथीदार आले. या वेळी हर्षदने सोनूला काळ्या म्हणत आवाज दिला. पण ते ऐकून तो भाई फारच भडकला. मग काय सोनूने अपली भाईगिरी दाखवाला सुरूवात केली. आता मार्केट खूप बदललं ,मी पहिल्यासारखे सोन्या राहिलो नाही. लहानपणी तू पाहिलेला सोनू आता सोनू भाई आहे असा दमच त्याने हर्षदला भरला. एवढंच नाही तर त्या भाईने त्याच्या दोन साथीदारांसह हर्षदला थेट मारहाण करायलाचा सुरूवात केली.
खिशातून चाकू काढत, त्याला चाकूचा धाक दाखवला आणि हर्षदच्या खिशातील 2600 रुपयांची रोकडही लुटली. नंतर सोनू भाई आणि त्याचे दोन साीदार तिथून लागलीच पसार झाले. हादरलेल्या हर्षदने डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेत अक्षय उर्फ सोनू दाते व त्याच्या दोन साथीदाराविरोधात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस निरीक्षक राहुल मस्के, संतोष उगलमुगले, संजय माळी, पोलीस हवालदार अनुप कामत, बापुराव जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन,रविंद्र लांडग याचे पथक तयार करण्यात आले. नंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने डोंबिवली येथे प्रगती कॉलेज परिसरात सापळा रचत अक्षय उर्फ सोनू दाते व त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या माहिती नुसार अक्षय उर्फ सोनू दाते हा सराईत गुन्हेगार असून त्याला मुंबई, ठाणे, रायगड या जिल्हयातुन दोन वर्षासाठी तडीपार होता . सध्या क्राइम ब्रांचने सोनूला ताब्यात घेतले असून, त्याने अजून अशा प्रकारे किती जणांना लुटले याचा तपास सुरू केला आहे