Dombivli Crime : मोमोज विकण्यासाठी दुकान भाड्याने घेतलं, भिंत फोडून ज्वेलर्सचं दुकानच लुटलं, लाखोंचे दागिने लंपास
डोंबिवलीमध्ये चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केली. दुकानात असलेले सोने व चांदीचे 76 लाखांचे दागिने चोरांनी लंपास केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही चोरी करण्यासाठी त्यांनी फूलप्रूफ प्लान आखला होता. कारण ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करण्यासाठी त्यांनी आधी शेजारचं दुकान भाड्याने घेतलं.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 1 डिसेंबर 2023 : चोरी करण्यासाठी चोरटे विविध शक्कल लढवतात, पण डोंबिवलीत मात्र चोरट्यांनी हद्दच पार केली. डोंबिवलीमध्ये चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केली. दुकानात असलेले सोने व चांदीचे 76 लाखांचे दागिने चोरांनी लंपास केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही चोरी करण्यासाठी त्यांनी फूलप्रूफ प्लान आखला होता. कारण ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करण्यासाठी त्यांनी आधी शेजारचं दुकान भाड्याने घेतलं होतं.
त्यानंतर बाजूच्या दुकानातून ज्वेलरी शॉपच्या भिंतीला मोठं भगदाड पाडून चोरटे आत घुसले आणि त्यांनी तब्बल 76 लाख रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या टीम बनवत तपास सुरू केला आहे.
मोमोज विकण्याच्या बहाण्याने भाड्याने घेतलं दुकान
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोड येथे रत्नसागर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. तेथे 28 नोव्हेंबरला चोरीची ही घटना घडली. चोरट्यांनी पलीकडच्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडले आणि ते आत शिरले. त्यानंतर दुकानाच्या डिस्प्ले काऊंटरला लावलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. तसेच दुकानातील तिजोरीही फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती तोडण्यात चोरांना अपयश मिळाले.
ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी फूलप्रूफ प्लान आखला होता. त्यांनी काही दिवस आधीच त्नसागर ज्वेलर्सच्या बाजूला असलेला दुकानाचा गाळा भाड्याने घेतला होता. मोमोजचे दुकान सुरू करण्यासाठी त्यांनी ही जागा भाड्याने घेतली, मात्र बऱ्याच दिवसानंतरही दुकान सुरू झाले नाही. तेव्हा दुकानमालकाने त्यांना विचारणा केली असता, घरात कोणालातरी बरं नाहीये, त्यामुळे दुकान सुरू करायला वेळ लागेल अशी थाप त्यांनी मारली. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांनी त्या दुकानातून बाजूच्या ज्वेलरी शॉपची भिंत फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आल्यावर त्यांनी हळूहळ खड्डा खणायला सुरूवात केली आणि नंतर ज्वेलर्सच्या दुकनाता प्रवेश करून चोरी करत लाखो रुपयाचे दागिने लुटले. याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची तीन पथके आरोपींच्या शोधार्थ पाठवण्यात आली आहेत.