Dombivli Crime : पाच ते सहा सेकंद ती… फक्त स्टूल उचलण्यास सांगण्याचं निमित्त झालं… संतप्त नवऱ्याने असं काय केलं ?
पती-पत्नी गावी गेले असता पत्नीच्या मामाला तिच्या गळ्यावर काही व्रण दिसले. हे कसं झालं असं विचारत त्यांनी तिची विचारपूस केली. मात्र त्यानंतर त्यांना जे समजलं ते ऐकून ते हादरलेच..

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 28 ऑक्टोबर 2023 : पती-पत्नीमधील भांडणं तर सामान्यपणे सगळीकडे होतच असतात. पण बऱ्याच ही भांडण सुरू होतात, आणि लगेच संपतातही. पण काहीवेळा ही भांडण एवढी टोकाला जातात, की रागाच्या भरात एखादं नको ते कृत्य होऊन बसतं. त्याने आयुष्यभराचं नुकसान होतं किंवा आयुष्यभर मनावर ओरखडे उमटतात.
अशीच एक घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये एका शुल्लक कारणावरून संतापलेला पती त्याच्या पत्नीच्या जीवावरच उठल्याचे पहायला मिळाले. साफसफाई करताना, झाडू मारताना पत्नीने पतीला फक्त स्टूल उचलून बाजूला ठेवायला सांगितलं. मात्र याच मुद्यावरून तो एवढा संतापला की त्याने पत्नीचा जीवच घ्यायचा प्रयत्न केला. खुशाल जाधव असे आरोपी पतीचे नाव असून मानपाडा पोलीसानी या प्रकरणी त्या निर्दयी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
असा उघडकीस आला प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खुशाल जाधव आणि त्याची पत्नी तनिषा हे दोघेही कल्याण पूर्व येथील मलंगडरोड परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात. आठ महिन्यांपूर्वी त्या दोघांचे लग्न झाले. मात्र खुशाल हा काहीच काम करत नसल्याने त्या दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायची. 22 ऑक्टोबर रोजी खुशाल आणि तनिषा हे दोघेही गावी गेले होते. तेव्हा तनिषाच्या मामाला तिच्या गळ्यावर काही व्रण दिसले. हे कसं झालं असं विचारत त्यांनी तिची विचारपूस केली.
तनिषाची हकीकत ऐकून हैराण झाले मामा
तेव्हा तनिषाने जी माहिती सांगितली, ते ऐकून तिचे मामा अक्षरश: हैराण झाले. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास तनिषा घरात काम करत होती. घरात साफसफाई करायची आहे, त्यामुळे लोखंडी स्टूल उचलून गॅलरीमध्ये ठेवा, एवढंच तिने पती खुशाल याला सांगितलं. मात्र ते ऐकताच खुशाल संतापला, आणि त्याने तनिषाला थेट मारहाणच करण्यास सुरूवात केली. ‘ तू नेहमी मला काही ना काही काम सांगतेस, ( कामावरून) बोलत राहतेस, आता तुझा आवाजच बंद करतो’ अशी धमकी त्याने दिली.
मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिला बेदम मारहाण केली आणि गॅलरीतील कपडे वाळत घालण्याची नायलॉनची दोरी आणली. ती दोरी तिच्या गळ्यात अडकवून त्याने तिला वर लटकवण्याचा प्रयत्न केला. त्या अवस्थेत मनिषा पाच ते सहा सेकंद हवेतच लटकत होती. तिचा जीव अक्षरश: घशाशी आला. कसाबसा प्रयत्न करून तिने तिचा जीव वाचवला आणि खाली उडी मारली. त्याचे वळ तिच्या मानेवर, गळ्यावर दिसत होते.
तनिषाने हा सगळा प्रकार सांगितल्यावर तिचा मामा हादरलाच. आपला जावई एवढा क्रूर असेल, लेकीसमान भाच्चीला असा त्रास होत असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांनी तातडीने तनिषासोबत पोलिस स्टेशन गाठून सर्व प्रकार कथन केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोंबिवलीत मानपाडा पोलिसांनी लगेच पती खुशाल विरोधात हत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.