डोंबिवलीत चाललंय काय ! हाय प्रोफाईल परिसरात तरूणांकडे जे सापडलं..
डोंबिवलीतील हाय प्रोफाईल पसिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीमधील खोणी येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 30 नोव्हेंबर 2023 : डोंबिवलीत सध्या वारंवार गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. पोलिसांची वाढती गस्त आणि बंदोबस्त असून गुन्ह्यांना घालण्यात यश मिळालेले नाही. त्यातच आता डोंबिवलीतील हाय प्रोफाईल पसिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीमधील खोणी येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल परिसरात छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.
त्यामध्ये दोन तरूणांना अटक केली तसेच त्यांच्याकडून एमडी नावाचं ड्रग्स आणि अडीच लाख रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. या परिसरातील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात पोलिसांना यश मिळालं. ड्रग्स विकणाऱ्या दोन्ही तरुणांना मानपाडा पोलीस स्थानकात आणण्यात आले असून हे ड्रग्स किती ग्राम आहे व कोणाला विकण्यासाठी आणले होते याचा तपास पोलिसांनी सुरू आहे.
ड्रग्स सापडल्याने खळबळ
नवीन वर्ष सुरू व्हायला आता एकच महिना उरला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी डिसेंबरअखेरीस पार्ट्यांचे सत्र सुरू होते. त्या दरम्यान असा पार्ट्यामध्ये तरूण अनेक व्यसने करतात, अमली पदार्थांचाही त्यात समावेश असतो. अशा वेळी पोलिस तरूणांवर कारवाई करतात. त्याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिना संपतानाच डोंबिवलीत अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही तरूण पलावा परिसरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी आले होते. मात्र स्थानिक नागरिकांना त्याची कुणकूण लागताच त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे, आणि त्यांच्या मदतीने मानपाडा पोलिसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या या दोन्ही आरोपींना चाब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा साठा आणि अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले. हे ड्रग नेमकं किती आहे, कुठून आणलं, आणि ते कोणाला विकणार होते, या सर्व गोष्टीचा तपास मानपाडा पोलीस स्टेशनमधील अधिकारी करत आहेत.