Dombivli Crime : प्रवासी बनून यायचे , निर्जन रस्ता दिसताच चाकूचा धाक दाखवत…
डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रवासी बनून ओला कॅबमध्ये बसायचे आणि संधी मिळताच त्या ड्रायव्हरला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 31 जानेवारी 2024 : डोंबिवलीमध्ये सध्या गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. कुठे चोरी, तर कुठे दरोडा… रोजच्या रोज काही ना काही बातम्या कानावर पडतच असतात. त्यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रवासी बनून ओला कॅबमध्ये बसायचे आणि संधी मिळताच त्या ड्रायव्हरला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. प्रवासी बनून ओला चालकांना लुटणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोल्या असून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमालही जप्त केला आहे.
फीक अबुबकर ,अमन तौकिर अहमद अन्सारी, आमन शैकत जमादार अशी या सराईत आरोपींची नावं आहेत. ते डोंबिवली परिसरात येणाऱ्या ओला चालकांना वाशीला जायचं आहे असे सांगत आणि त्याच्या गाडीत बसत. रहदारी नसलेलं ठिकाण आलं की गाडी थांबवत आणि चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडचे पैसे,मोबाईल , किमती वस्तू घेऊन फरार होत. अखेर या चोरट्यांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
असा उघडकीस आला गुन्हा
डोंबिवली जवळील ग्रामीण भागात काटई नाका येथे सचिन शाव हा ओला कारचालक कार घेऊन जात होता. याच दरम्यान तीन प्रवासी वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसले. काही अंतरावर जाताच त्यांनी ओला चालकाला चाकूच्या धाक दाखवत थांबवले आणि त्याची कार , रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड ,संपत फडोळ ,प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासांती यातील चोरट्यांची ओळख पटवली आहे. मानपाडा पोलिसांनी काटई नाक्यावरच सापळा रचत अटक केली. शफिक खान ,अमन अन्सारी आणि आमन जमादार असे या तिघांची नावे आहेत. या तिघांनी याआधीही कोणाला लुटले आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. सर्व आरोपी हे डोंबिवली पूर्वेतील खोणी परिसरात असलेल्या पलावामध्ये राहणारे आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारांकडून लुटण्यात आलेली कार, रोकड आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत