Dombivli Crime : आधी ओला बूक करायचे, सामसूम ठिकाण आलं की … त्या चौघांच्या प्लानने शहर हादरलं
कल्याण गुन्हे शाखा युनिट व डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या.आरोपींमध्ये एका अल्पवीन मुलाचाही समावेश आहे. त्यांनी अजून किती जणांना लुटलं याचा तपास करण्यात येत आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 16 ऑक्टोबर 2023 : ओला, उबर टॅक्सीने (cab journey) आपल्यापैकी बहुतेकांनी प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान चालकाने खोडसाळपणा केल्याच्या किंवा चुकीचे वर्तन केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. पण डोंबिवलीमध्ये विपरीत प्रकार घडल्याचे समोर आले. एका ओला चालकाला सुनसान ठिकाणी ( looted cab driver) नेऊन त्याला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपींना अखेर बेड्या ठोकत अटक केली. रामनगर पोलिसांनी ही कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समजते. या आरोपीने अशा प्रकारे अन्य किती जणांना लुटले याचा तपास सध्या सुरू आहे. आकाश सिंग ,राहुल जगताप,सनी तूसांबड असे आरोपींचे नाव असून अल्पवयीन गुन्हेगाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
काय घडल होतं ?
9 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. एका ओला चालकाची गाडी बूक करून, त्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चौघांनी लुटले. डोंबिवलीतील चोळेगाव परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कल्याण गुन्हे शाखा युनिट ०३ व डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते सह एपीआय सानप, पोहवा वाघ, पोहवा सरनाईक, सांगळे, पोटे याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास सुरू केला. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग आणि तांत्रिक मदतीच्या आधारे त्यांनी चारही आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या.
आकाश सिंग ,राहुल जगताप,सनी तूसांबड असे या आरोपींचे नाव असून यात एक अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या चौघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आधी त्यांनी ओला बूक केली त्यानंतर कारमध्ये बसून प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान कार एका निर्जन रस्त्यावर पोहोचल्यानंतर चौघांपैकी एकाने कारचालकाच्या मानेवर कटर ठेवून त्याला मारण्याची धमकी दिली. धाक दाखवत त्याला कारच्या बाहेर काढले आणि त्याच्याकडून जवळपास ४० हजार रुपयांच्या वस्तू, चांदीचे पैंजण तसेच मोबाईल असा मुद्देमाल लंपास करत आरोपींनी पोबारा केला. पोलिस सर्व आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांनी आणखी किती जणांना अशा पद्धतीने लुटले याचाही तपास करण्यात येत आहे.