Dombivli news : पोलीस बनले वीटभट्टी कामगार, सराईत आरोपीच्या अटकेसाठी वेष बदलून थेट…
या आरोपीवर 22 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. त्याच्या शोधासाठी पोलिस थेट आझमगडपर्यंत जाऊन पोहोचले. डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या या काररवाईमुळे मोठे कौतुक होत आहे.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 7 नोव्हेंबर 2023 : गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. चोऱ्यांचं, गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललय अशी एक ना अनेक वाक्य आपण रोजच ऐकत असतो. पण डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी जे केलं ते ऐकाल तर तुमचे डोळेच विस्फारतील. 22 पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यसाठी पोलिस थेट आझमगडला जाऊन पोहोचले. विशेष म्हणजे त्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी थेट वीटभट्टी कामगारांचा पेहराव केला आणि तब्बल पाच दिवसा नंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश अरविंद राजभर असे या सराईत गुन्हेगाराच नाव असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे
अशी केली कारवाई
डोंबिवली पूर्व परिसरात राहणारे ओमकार भाटकर हे रक्षाबंधन सणाकरीता आपल्या गावी गेले. त्याचेवळी एक चोरटा त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून आत घुसला आणि घरातील सोन्या, चांदीचे दागिने चोरी करून पसार झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर कल्याण झोन 3 चे dcp सचिन गुंजाळ याच्या मार्गदर्शन खाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुणमाणे यांही एपीआय तारमळे , वणवे याचे पथक तयार करून सीसीटीव्ही व गुप्त बातमीदाराच्या मदतीने माहिती काढली. तेव्हा संशयित आरोपी आरोपी हा आझमगड मध्ये राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी थेट आजमगड गाठले. आणि वीटभट्टी कामागरांचा पेहराव करून त्या परिसरातील वीटभट्टीवर सुमारे पाच दिवस काम करून आरोपीवर पाळत ठेवण्यास सुरूवात केली. पाचव्या दिवशी सापळा रचत कामगारांच्या वेषातील पोलिसांनी आरोपी राजेश अरविंद राजभर याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून 21 लाख 26 हजार 600 रुपये किमतीचे सुमारे 343.5 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केले.
पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश हा एक सराईत चोरटा असून त्याने महात्मा फुले, पनवेल, अर्नाळा सागरी, अंबरनाथ, कोळसेवाडी, बदलापूर, शिवाजीनगर, डोंबिवली, डायघर परिसरात 22 पेक्षा अधिक ठिकाणी घरफोी करत चोरी केली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आरोपी राजेश हा फक्त चोरीसाठी आझमगडहून मुंबईत यायचा आणि इमारतींची रेकी करून मगच चोरी करायचा, असेही तपासात समोर आले आहे. या आरोपीने अजून किती ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे चोरी केले आहेत याचा शोध आता मानपाडा पोलीस घेत आहेत.