पोलिसांच्या मुलीही असुरक्षित, दुसरीही मुलगी झाल्याने सासरकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांच्या जन्माचा आग्रह कधी अट्टाहासात रुपांतरीत होईल आणि कौटुंबिक हिंसाचाराचं निमित्त होईल हे काही सांगता येत नाही.
बीड : पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांच्या जन्माचा आग्रह कधी अट्टाहासात रुपांतरीत होईल आणि कौटुंबिक हिंसाचाराचं निमित्त होईल हे काही सांगता येत नाही. यातूनच महाराष्ट्रात अनेक महिलांचा छळही झाला आणि अनेक मुलींना जन्म होण्याआधीच मारलं गेलं. यानंतर सरकारने मुलींच्या भ्रूणहत्येविरोधात कायदाही केला. मात्र, त्यातूनही अनेक पळवाटा शोधल्या जात असल्याचं समोर येतंय. असाच एक प्रकार बीडमध्ये घडला आहे. दुसरीही मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीलाच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झालाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. या घटनेनंतर बीडमध्ये पोलिसांच्या मुलीही सुरक्षित नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत (Domestic Violence with daughter of police due to second baby girl birth in Beed).
वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचा काही नेम नाही. याच हव्यासापोटी बीडमध्ये दुसरीही मुलगीच झाल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे ही विवाहिता पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे. तिच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडितेचा पती हा व्यवसायाने उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारी डॉक्टर आहे. आरोपी पतीने दुसरीही मुलगी झाल्याच्या रागातून मध्यरात्रीच्या वेळी पीडितेला मारहाण केली. तसेच तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने आपल्या 3 महिन्यांचं बाळ घरातंच सोडून आपला जीव वाचवत पलायन केलं. त्यामुळे तिचा जीव वाचला.
दरम्यान, पीडित महिलेने कळंब पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितल्यावर देखील पोलिसांनी अद्याप तक्रार घेतली नाही. पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच पोलीस मुलीची तक्रार घेतली नसल्याने परिवाराने खंत व्यक्त केलीय. तसेच पोलिसांच्या कुटुंबालाच न्याय मिळणार नसेल तर मग कुणाल मिळणार? असा संतप्त सवाल केला जातोय.
हेही वाचा :
महाराष्ट्रात किती टक्के महिलांवर पतीकडून हिंसाचार? NHS च्या अहवालात धक्कादायक खुलासे
Domestic Voilence | ‘वेळीच बोलत्या व्हा!’, महिलांवरील अत्याचार विरोधात एकवटल्या बॉलिवूड अभिनेत्री
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सुनेला सासू-सासऱ्यांच्या घरातही अधिकार
व्हिडीओ पाहा :
Domestic Violence with daughter of police due to second baby girl birth in Beed