पुन्हा ‘दृश्यम’, 2 वर्षांपासून बेपत्ता माणसाचा शोध लागला, पोलिसांना थेट सांगाडाच ..
तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या माणसाचा शोध लावण्यात बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना यश मिळालं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो माणूस तर सापडला, पण जिवंत नव्हे मृत..
तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या माणसाचा शोध लावण्यात बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना यश मिळालं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो माणूस तर सापडला, पण जिवंत नव्हे मृत.. दोन वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या व्यक्तीचा पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडाच पोलिसांनी बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात हिवरखेड येथे एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदू धंदरे असे मृत इसमाचे नाव आहे. ते ऑक्टोबर 2022 पासून बेपत्ता होते. यासंदर्भात नंदू यांची पत्नी सविता यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस तपासही करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी त्यांचा मोबाईल , सर्व संशयितांचे मोबाईल नंबर, त्यांचे ‘लोकेशन’ इत्यादि माहिती घेण्यात आली. याच तपासादरम्यान पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की नंदू यांचा खून झाला असून त्यांचा मृतदेह एका शेतात पुरण्यात आला आहे.
हा धागा पकडूम पोलिसांना तपास वाढवला, त्यावेळी नंदू याचे अतुल गंगाधर कोकरे याच्याशी सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली. तेव्हा पोलिसांनी अतुलसोबत नेहमी असणाऱ्या दीपक ढोकेला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवत त्याची चौकशी करत माहिती काढली. त्याने माहिती देत नंदूचे प्रेत जिथे पुरले होतं ती जागा दाखवली. अतुल कोकरे आणि दीपक डोके यांनी नंदूचा खून करून त्याचा मृतदेह स्वतःच्या शेतात 2 वर्षांपूर्वीच पुरला होता. अखेर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरवलेला सांगाडा बाहेर काढला. त्यानंतर अतुल व दीपक दोघांना अटक केली.
का केला खून ?
मिळालेल्या माहितीनुसार नंदु धंदरे आणि आरोपी अतुल कोकरे यांचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या दोघांमध्ये त्या महिलेवरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या वादातून अतुल कोकरेने नंदूचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने फावड्याच्या दांड्याने नंदूच्या डोक्यावर वार केले तसेच दगडाने मारून त्याचा जीव घेतला. त्यानंतर दीपक ढोके याच्या मदतीने त्याच्या शेतातच खड्डा करून नंदू याचा मृतदेह पुरला. अखेर दोन वर्षांनी या खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी अतुल आणि दीपक या दोघांना अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.