वहिनीमुळे साखरपुडा होत नव्हता, दिरांनी ‘असा’ शिकवला धडा
वहिनी साटेलोटे करण्यास तयार नसल्याने लग्न जमत नसल्याने संतापलेल्या दिरांनी वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची घटना राजस्थानमधील जालौर येथे घडली आहे.
जालौर : साटेलोटेच्या प्रथेला तयार नसलेल्या वहिनीची तिच्या दोन दिरांनी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. वहिनीने आपली मुलगी साटेलोटेच्या प्रथेसाठी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोपी दिरांचे लग्न होत नव्हते. याच रागातून दोन सख्ख्या दिरांनी वहिनीला कायमचे संपवण्याचा कट रचला. घरात मोठा भाऊ नसल्याची संधी साधून आरोपींनी हे भयंकर कृत्य केले. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेलेल्या शेजाऱ्यावरही आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. तसेच 12 वर्षाच्या पुतण्यावरही कुऱ्हाडीने प्राणघातक वार केला. याप्रकऱणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हत्येनंतर आरोपीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न
यानंतर आरोपींपैकी एकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 12 वर्षांच्या पुतण्यावर राजौरच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राजौरच्या मोदरान गावामध्ये पोलीस पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरच्या अंतरावर ही धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या सजग कारभाराचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुलीचे साटेलोटे करण्यास तयार नव्हती वहिनी
इंद्रा रतनसिंह कवर (45) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पती नोकरी निमित्ताने दुसऱ्या गावात वास्तव्याला होता, तर इंद्रा ही मुलगा आणि मुलीसोबत घरात राहत होती. तिने आपल्या मुलीचे साटेलोटे पद्धतीने लग्न लावून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही दिरांचे लग्न ठरत नव्हते. याच रागातून दोन दिरांनी वहिनीच्या हत्येचा कट रचला आणि बिनदिक्कतपणे वहिनीला जिवंत मारण्यात आले.
भांडण सोडवायला आलेल्या शेजाऱ्यालाही संपवले
डुंगरसिंह आणि पहाडसिंह अशी मारेकरी दिरांची नावे आहेत. लग्नाच्या विषयावरून घरामध्ये जोरदार भांडण झाले होते याच भांडणात सख्ख्या दिरांनी वहिनीवर कुऱ्हाड उचलून तिची हत्या केली. भांडणा दरम्यान शेजारच्या हरीसिंह नावाच्या रहिवाशाने धाव घेतली. त्यांनी आरोपी दिरांना वहिनीसोबत भांडण न करण्याचा सल्ला दिला. त्यावर आरोपींनी हरी सिंह यांनाही पाठलाग करून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या हरी सिंह यांचाही मृत्यू झाला.
हा थरारक घटनाक्रम घडत असताना कुटुंबातील एका मुलीने पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यामुळे कुटुंबातील इतरांचे प्राण वाचले. अन्यथा संतापाच्या भरात आरोपींकडून कुटुंबातील अन्य सदस्यांची हत्या होण्याची भीती होती. महिलेचा पती हैदराबाद येथे नोकरी करतो. पोलिसांनी त्याला माहिती दिली आहे.