वडिलांच्या आजारपणाचा त्रास व्हायचा, वैतागलेल्या मुलाने पुढे जे केले त्याने सर्वच हैराण झाले
शामसुंदर शिंदे हे दहा वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागातून सेवानिवृत्त झाले होते. श्यामसुंदर शिंदे हे मनोरुग्ण होते. घरामध्ये ते नेहमी कटकट करत असत. त्यांच्या कटकटीला घरातील सगळे वैतागले होते.
डोंबिवली / सुनील जाधव : वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलानेच आपल्या पित्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये उघडकीस आला आहे. डोंबिवलीच्या खांबाळपाडा भोईरवाडी परिसरात ही खळबळजनक घटना घडली. शामसुंदर शिंदे असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे, तर तेजस शिंदे असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
वडिलांच्या आजारपणाला कंटाळून केली हत्या
वडील आजारी असल्याने त्यांच्या आजारपणाचा त्रास घरच्यांना व्हायचा आणि त्यामुळेच याला वैतागलेल्या मुलाने वडील झोपेत असताना डोक्यात दगडी जातं टाकून आणि गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या केली. वडिलांच्या हत्येनंतर तेजसने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या हत्येची माहिती पोलिसांना दिली. सध्या या प्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
झोपेत असताना डोक्यात दगडी जाते घातले
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. शामसुंदर शिंदे हे दहा वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागातून सेवानिवृत्त झाले होते. श्यामसुंदर शिंदे हे मनोरुग्ण होते. घरामध्ये ते नेहमी कटकट करत असत. त्यांच्या कटकटीला घरातील सगळे वैतागले होते. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास श्यामसुंदर हे घरात झोपले असतानाच त्यांचा मुलगा तेजस याने दगडी जाते त्यांच्या डोक्यात घातले. त्यानंतर भाजीच्या सुरीने त्यांच्या गळ्यावर सपासप वार केले.
हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला
या हल्ल्यात शामसुंदर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेजसने घरातून पळ काढला आणि तो थेट टिळकनगर पोलीस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.