ईडीच्या सहायक संचालकालाच लाच घेताना CBI ने केली अटक, ज्वेलर्सच्या मुलाला सोडण्यासाठी मागितली 20 लाखांची लाच
तक्रारदाराचा मुलगा निहार ठक्कर याला ईडीकडून सुरु असलेल्या तपास प्रकरणात अटक न करण्याच्या बदल्यात आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या ( ईडी ) एका सहाय्यक संचालकालाच लाच घेताना सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टींगेशनने ( सीबीआय ) गुरुवारी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत स्थित एका ज्वेलर्सकडून 20 लाखाची लाच स्विकारल्या प्रकरणात सीबीआयने ईडीच्या असिस्टंट डायरेक्टरला अटक केल्याचे म्हटले जात आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
3 आणि 4 ऑगस्ट रोजी मुंबईतील ज्वेलर्स विपुल हरिश ठक्कर यांच्या कार्यालय आणि घरावर ईडीने झडती सुरु केली आहे. या प्रकरणात ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांनी ज्वेलर्स विपुल हरिश ठक्कर यांना धमकावून त्यांच्याकडून 25 लाखाची मागणी केली. या प्रकरणात ठक्कर यांच्या मुलाला अटक न करण्याच्या बदल्यात ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांनी ही लाच मागितल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर तडजोडीनंतर 20 लाखांवर सौदा ठरला. या प्रकरणानंतर संबंधित ज्वेलर्सने तक्रार केल्यानंतर सीबीआयने सापळा रचला. त्यानंतर लाच स्विकारताना सीबीआयने सापळा रचून ईडीचे सहाय्यक संचालक यादव यांना अटक केली. ज्वेलर्स विपुल हरिश ठक्कर यांचे पूत्र निहार ठक्कर यांना अटक न करण्याच्या बदल्यात यादव यांनी लाच मागितली होती.
निहारला अटक होऊ नये म्हणून लाच
स्वतंत्र साक्षीदारांच्या समक्ष या तक्रारीची पडताळणी केली असता प्रथमदर्शनी दिल्लीतील ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यांनी लाच मागितल्याचे उघड झाले, त्यांनी अज्ञातांसोबत 20 लाख रुपयांचा फायदा मिळविण्यासाठी स्वत: आणि इतरांमार्फत गुन्हेगारी कट रचल्याचे स्पष्ट झाले.