Kalyan Crime : मास्तर तुमी बी…, पोलिसांची ‘त्या’ ठिकाणी छापेमारी, शिक्षकासह आठ जणांना अटक
कल्याण-डोंबिवलीत अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी एक विशेष पथक बनवून छापेमारी सुरु केली आहे.
कल्याण / 30 ऑगस्ट 2023 : कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. नेहमी काही ना काही गुन्हेगारी घटनांनी कल्याण-डोंबिवली चर्चेत असते. लूट, हाणामारी, महिलांवरील अत्याचार यासोबतच अंमली पदार्थ तस्करीच्या घटनाही कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात घडतात. अंमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीवेळी पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करासह आठ जणांना अटक केली आहे. नशा करणाऱ्यांना पाहून पोलिसही हैराण झाले. कारण नशा करणारे सर्व उच्चशिक्षित तरुण होते. विशेष म्हणजे नशेखोरांमध्ये एक बी टेक शिक्षक आहे. कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. नानिकराम मंगलानी असे अटक तस्कराचे नाव आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची छापेमारी
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारी वाढली आहे. हत्या, जीवघेणा हल्ला, अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह चोरी आणि घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्तहा पोलिसांनी पकडलेले अनेक जण नशेच्या आहारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कल्याण डोंबिवलीत चरस आणि गांजाची तस्करी सुरु असल्याने याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
अशा गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंमली पदार्थांच्या तस्करांवर लक्ष ठेवून आहे. या पथकाला कल्याण कोळसेवाडी परिसरात अंमली पदार्थांचा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी छापे टाकला. या छाप्यादरम्यान गांजाची नशा करणाऱ्या 8 तरुणांना ताब्यात घेतले.
अटक तरुणांमध्ये शिक्षकाचा समावेश
अटक केलेले सर्व हे तरुण उच्चशिक्षित असून, चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत. त्यापैकी एक बी टेक शिक्षक असल्याचे कळताच पोलीस हैराण झाले. शिक्षकच अशा मार्गाला लागले तर विद्यार्थ्यांनी कुणाकडून आदर्श घ्यायचा असा प्रश्न आहे. या तरुणांना गांजा पुरविणाऱ्या नानिकराम मंगलानी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तो गोळवली परिसरात राहत असून, अनेक ठिकाणी गांजा पुरवतो. हा गांजा तो कुठून आणतो आणि कोणाला विकतो याबाबत कोळसेवाडी पोलीस तपास करीत आहेत.