भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार, खडसे यांच्या अडचणी वाढणार ?
भाजप-सेनेचे सरकार असतांना एकनाथ खडसे हे मंत्री होते, मंत्री पदाचा फायदा घेत एकनाथ खडसे यांनी भूखंड लाटल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्या अडचणीत दिवाळीनंतर वाढ होणार आहे. भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांची पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बंड गार्डन येथे एकनाथ खडसे यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. मात्र, तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास न झाल्याचा आक्षेप तक्रारदार यांनी केला आहे. एकूणच न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. एकूणच माजी मंत्री एकनाथ खडसे हे भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे. खडसे यांना चौकशीत जवळपास क्लीनचिट मिळेल अशी खात्री होती, मात्र नव्याने तपास केला जाणार असल्याने खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.
भाजप सेनेचे सरकार असतांना एकनाथ खडसे हे मंत्री होते, मंत्री पदाचा फायदा घेत एकनाथ खडसे यांनी भूखंड लाटल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
भोसरी जमीन भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यात खडसे यांच्यासह त्यांच्या नातलगांची चौकशी करण्यात आली होती.
पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात एसीबीकडून गुन्हा ही दाखल करण्यात आलेला होता, त्यानुसार विविध यंत्रणांकडून खंडसे यांची चौकशी सुरू होती.
त्यानंतर न्यायालयात एकनाथ खडसे यांच्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट देखील सादर करण्यात आला होता, मात्र त्यावर तक्रारदार यांनी आक्षेप घेत तक्रारीत नमूद केलेल्या बाबींचा तपास न झाल्याचे म्हंटले आहे.
त्यावरून पुन्हा न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असून दिवाळीनंतर ही चौकशी पुन्हा केली जाणार आहे.
त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत एकनाथ खडसेंना अटक न करण्याच्याही न्यायालयाच्या सूचना आहेत.