जादूटोणा करत असल्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण, जखमी जोडप्याला रुग्णालयात नेले पण…
जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी झाले. नातेवाईकाने त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले.
बीरभूम : जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एका वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण करत असल्याची घटना पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना सिउरी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीसाठी विनंती करणार आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील अहमदपूरच्या नापारा येथे ही घटना घडली.
उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
याप्रकरणी काल मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती. तिची चौकशी केली असता सहा जणांची नावे उघड झाली. त्यानुसार आज पोलिसांनी सहा जणांना अटक केली. पेंडू हेम्ब्रम आणि पार्वती हेम्ब्रम अशी मयत जोडप्याची नावे आहेत. बीरभूमच्या सैथिया थाना अहमद चौकी अंतर्गत नापरा गावात ते राहत होते. शनिवारी सकाळी गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या नातेवाईकाने त्यांना बोलपूर येथील सियान रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
जादूटोण्याच्या आरोपावरून दाम्पत्याला बेदम मारहाण
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नापारा गावातील मोरल रुबाई बेसरा हिच्यासह परिसरातील काही लोकांना पेंडू आणि त्यांची पत्नी जादूटोणा करीत असल्याचा संशय होता. याच संशयातून वृद्ध दाम्पत्याला शुक्रवारी रात्री घरात घुसून मारहाण करण्यात आली. मोरल हिच्या नेतृत्वाखाली आरोपींनी वृद्ध जोडप्याला बेदम मारहाण केली. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.