सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सूर्यवंशीवाडी, येळावी येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकाची वीजचोरी महावितरण (Mahavitaran)ने पकडली आहे. या ग्राहकांने वीजमीटर बायपास करून थेट जोडणीद्वारे वीज (Electricity) वापर करीत 39 हजार 788 वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे 5 लक्ष 50 हजार रूपयांची वीजचोरी केली. सदर प्रकरणी महावितरणने वीज वापरकर्ते अनिकेत जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याविरूध्द वीजचोरीचा गुन्हा (Case) दाखल केला आहे.
तासगाव तालुक्यातील सूर्यवंशीवाडी, येळावी येथील वीजग्राहक नामे यशोदा उद्योग समूहाच्या वीजमीटरची तपासणी 20 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आली. वीजमीटरला जोडण्यापूर्वीच सर्व्हिस वायरला एक केबल जोडून त्यावरून वीजभार वापर करण्याची युक्ती ग्राहकाने अवलंबली होती.
सर्व्हिस वायर पुढे वीज मिटरला जोडली होती. वीज वापराची नोंद होणार नाही, अशा पध्दतीने वीज मीटर बायपास केले होते.
वीजचोरीच्या फेब्रुवारी 2021 ते जुलै 2022 या निर्धारित 18 महिने कालावधीत 39 हजार 788 युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार 5 लाख 50 हजार 262 रुपये बिल देण्यात आले होते. नोटीस देऊनही ग्राहकाने वीजचोरीचे दंडाचे बिल भरले नाही.
सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये निकेत जगन्नाथ सूर्यवंशी यांच्याविरूध्द सांगली शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकार्यकारी अभियंता भारत व्हनमाने, कनिष्ठ अभियंता आदित्य पडघान, प्रधान तंत्रज्ञ सुनिल कदम, वरिष्ठ तंत्रज्ञ विकास गणवीर यांनी ही कारवाई केली.