Shrinagar Encounter : श्रीनगरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; गोळीबारात एक जवान जखमी
श्रीनगरच्या नोहाटा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराबंदी घातली आणि शोध मोहीम राबवण्यात आली.
श्रीनगर : देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होत असतानाच सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. श्रीनगरच्या नोहाटा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक (Encounter) सुरू झाली आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी (Terrorist Injured) झाला आहे, तर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका जवाना (Jawan)ला गोळी लागली आहे. घटनास्थळावरून लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांनी वापरलेली स्कूटर जप्त करण्यात आली आहे. तसेच एक एके-74 रायफल आणि दोन ग्रेनेड देखील जप्त करण्यात आले आहेत. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करून या चकमकीची माहिती दिली आहे. चकमकीत सर्फराज अहमद नावाचा पोलीस जखमी झाल्याचे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा दले अलर्ट मोडवर
भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात जल्लोषी सेलिब्रेशन सुरु आहे. याचदरम्यान दहशवाद्यांकडून हल्ल्याचे कट आखले जाऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. त्याचदरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्याची दखल घेऊन सर्व सुरक्षा दले अलर्ट मोडवर आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांचे कट उधळून लावले जात आहेत. सीमेवरच्या सर्व संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
संपूर्ण परिसराला घेराबंदी आणि शोध मोहीम
श्रीनगरच्या नोहाटा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराबंदी घातली आणि शोध मोहीम राबवण्यात आली. याच दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना उडालेल्या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला आहे.
24 तासांपूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यावर झाला होता ग्रेनेड हल्ला
याआधी शनिवारी श्रीनगरच्या इदगाह परिसरात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. त्या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी आणि शोध मोहीम सुरू ठेवली आहे. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी नोहाटा परिसरात गोळीबार करून चकमक घडवून आणली. दोन दिवसांपूर्वी राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर दोन दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हल्ला केला होता. त्या हल्ल्यात सुरक्षा दलांचे चार जवान शहीद झाले होते. दहशतवादी लागोपाठ हल्ले करू लागल्यामुळे सुरक्षा दले डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देत आहेत. (Encounter between security forces and terrorists on eve of Independence Day in Srinagar; One jawan injured)