मुलाला इंजिनिअरींग जमत नसल्याने शेती कर सांगितले, मुलाने केली आई-वडिलांची हत्या
उत्कर्ष याने 26 डिसेंबर रोजी त्याच्या आईची राहत्या घरात हत्या केल्याची कबूली दिली आहे. त्यानंतर वडीलांनाही संपवल्याचे त्याने म्हटले आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून याने ही हत्या त्याने एकट्याने केली की आणखी कोणी सोबत होते याचा शोध पोलिस घेत आहेत.
इंजिनिअरींगला असलेला मुलगा सातत्याने नापास होत असल्याने त्याला आई-वडिलांनी वारंवार टोमणे मारणे सहन झाले नाही. त्यातच त्याला शेती करण्यास सांगितल्याने संतापलेल्या या मुलाने साक्षात आपल्या आई-वडीलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. नागपूरातील कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन वर्षांच्या सुरुवातीला दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. लीलाधर डाखोळे आणि अरुणा डोखोळे यांचा मुलगा उत्कर्ष ( २४ ) यानेच आपल्या आई-वडिलांचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.
कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर कार्यरकत असलेले लीलाधर डाखोळे आणि त्यांची पत्नी अरुणा या संगीत विद्यालयात शिक्षिका..मुलगा उत्कर्ष ( २४ ) आणि मुलगी सेजल (२१ )यांच्या चौकोनी कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला. उत्कर्ष हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. तर मुलगी बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला आहे. उत्कर्ष गेले अनेक वर्षे नापास होत होता. त्यामुळे त्याला बैलवाड्याची शेती करण्यासाठी सांगत होते. २५ डिसेंबरला त्याच्या वडीलांनी उत्कर्षला मारहाण केली आणि आईने त्याची बॅगही भरुन ठेवली होती. आता शेती करावी लागणार या कल्पनेने घाबरलेला उत्कर्ष रोजच्या टोमण्यांना कंटाळलेला होता.
पेपर ब्लँक सोडून यायचा
सहा वर्षांपासून इंजिनीअर करत असलेल्या उत्कर्ष पेपर ब्लँक सोडून येत होता म्हणून आई- वडिल त्याला दुसरं काही तरी करण्याचा सल्ला देत होते. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्याने याच रागातून विद्यार्थ्यांचे पेपर तपास बसलेल्या आईचा मागून येऊन गळा दाबून तिला ठार केले. त्यानंतर वडील आल्यानंतर त्यांना हे दृश्य पाहून धक्का बसला ते सोफ्यावर बसले असता त्यांच्या मानेवर चाकूने वार करुन त्याने त्यांनाही ठार केले. आणि दार बंद करुन त्याने कॉलेजला गेलेल्या बहिणीला खोटे सांगून आपल्या काकांकडे राहायला जाण्यास सांगितले. आई-वडील मेडिटेशनला बंगलोरला गेल्याचे त्याने बहिणीला सांगितले. त्यानंतर एक नातेवाईक त्यांच्या घरी आले त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले.