फोन आला, गर्लफ्रेन्ड हो तर पास करेन…अखेर निकाल लागला, मार्क्स पाहिले …असं कसं होवू शकतं?
कॉलेजमध्ये नुकतीच परिक्षा पार पडली होती. या परिक्षेत विद्यार्थिनी एका पेपरमध्ये नापास झाली होती. तिने बॅक पेपर दिला, यातही तिला फक्त 11 गुण मिळाले. यानंतर विद्यार्थिनीने पेपर रिचेक करण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाकडे अर्ज दाखल केला.
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बॅकच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीला अज्ञात नंबरवरुन कॉल करुन पास परिक्षेत पास करण्यासाठी 5 हजार रुपये देण्याची मागणी केली. विद्यार्थिनीने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगताच त्या व्यक्तीने तिला पैसे नसतली तर माझी गर्लफ्रेंड हो, तुला पास करतो, असे सांगितले. विद्यार्थिनीने दोन्ही ऑफर नाकारत सदर व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा परिक्षेचा निकाल आला तेव्हा तिला धक्काच बसला. परिक्षेत तिला खरोखर शून्य गुण मिळाले होते. यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीकडून सदर नंबर हस्तगत केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडिता इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी
कानपूरच्या घाटमपूर परिसरात राजकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सदर विद्यार्थिनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. महाराजपूरमध्ये राहणारी सदर विद्यार्थिनी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत असून, घाटमपूरमध्येच ती पीजीमध्ये राहते.
परिक्षेत कमी गुण मिळाल्याने पेपर रिचेकिंग दिला होता
कॉलेजमध्ये नुकतीच परिक्षा पार पडली होती. या परिक्षेत विद्यार्थिनी एका पेपरमध्ये नापास झाली होती. तिने बॅक पेपर दिला, यातही तिला फक्त 11 गुण मिळाले. यानंतर विद्यार्थिनीने पेपर रिचेक करण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार कॉलेजने तिचा पेपर रिचेकला पाठवला.
अज्ञात नंबरवरुन फोन करुन आधी पैशाची मागणी केली
यादरम्यान विद्यार्थिनीला 21 नोव्हेंबर रोजी अज्ञात नंबरवरुन फोन आला. फोनवरुन त्या व्यक्तीने विद्यार्थिनीला 5 हजार रुपये दे तुला पास करतो असे सांगितले. मात्र आपल्याकडे इतके पैसे नसल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने तिला सांगितले की, पैसे देऊ शकत नसशील तर माझी गर्लफ्रेंड हो. याशिवाय अश्लिल संभाषणही केले.
आधी विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले
त्यानंतर त्या नंबरवरुन अनेकदा तिला कॉल आले. मात्र कुणी मित्र मस्करी करत असल्याचे समजून तिने त्या फोनकडे दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा पेपर रिचेकिंगचा रिझल्ट आला तेव्हा तिला धक्काच बसला. तिला खरोखर पेपरमध्ये शून्य गुण मिळाले होते.
पोलिसात तक्रार दाखल
निकाल पाहिल्यानंतर तिला फोनवरील व्यक्तीचे संभाषण आठवले आणि तिचा विश्वास बसला की पेपर चेक करणाऱ्याचाच हा फोन होता. यानंतर विद्यार्थिनीने आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ सदर व्यक्तीचा तपास सुरु केला आहे.