IPL Scam : खुद्द हर्षा भोगलेलाही हसू आवरलं नाही! IPL सट्टे बाजीचं ते गुजरात मॉडेल, ज्याचा कुणी विचारही केला नसेल!
Crime News : बोगस आयपीएलच्या नावाखाली लुटणाऱ्या या टोळीच्या गुजरात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
आयपीएल (IPL) सुरु असताना आयपीएलचे सट्टे लावले जातात. त्यावर कारवाई केली जाते. हे एकट्या महाराष्ट्रात होतं असं नाही. आयपीएल सुरु असलं की देशभरात आयपीएल सट्टेबाजीचं सत्र संपूर्ण भारतात पाहायला मिळतच. पण आता आयपीएल सुरु नाहीये. तरिही एक मोठी कारवाई आयपीएल सट्टेबाजांवर करण्यात आली आहे. महाठग सट्टेबाजांनी डमी आयपीएल सुरु केलं. चकीत करणारी बाब म्हणजे कुणी कल्पनाही केली नसेल, असा सेटअप या सट्टेबाजांनी लावला होता. थेट रशियातील (Russia News) लोकांना या सट्टेबाजांनी आपलं गिऱ्हाईक बनवलं होतं. गुजरातमध्ये आयपीलएल सारखा एक खोटा बनावट प्रकार रचला. त्यासाठी मैदान, अंपायर, खेळाडू, मॅट, कॉमेन्ट्री असं सगळंच केलं. हर्षा भोगले सारखा आवाज काढणाऱ्या एका कॉमेन्ट्रीवाल्यालाही कामाला लावलं आणि पद्धतीश मॅचचं लाईव्ह (Cricket Match Live) ब्रॉडकास्टही केलं. महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंनी चारशे देऊन हे महाठग मैदानात मॅच खेळवत होते. अखेर आता या संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी पोलसांनी मोठी कारवाई केली आहे.
चौघांना अटक
बोगस आयपीएलच्या नावाखाली लुटणाऱ्या या टोळीच्या गुजरात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक, सट्टेबाजी आणि अन्य सामान जप्त करण्यासह पोलिसांनी कारवाई केली आहे. अजूनही याप्रकरणी इतर काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बोगस IPLवर खराखुरा सट्टा
गुजरातच्या वडनगरमधील मॉलीपूर गावात काही लोकांना एक कंपनी खरेदी केली. त्यानंतर या कंपनीच्या ठिकाणी क्रिकेटचं मैदान बनवलं. पद्धतशीर पीट, लाईट, मल्टी कॅमेरा सेटअप असं सगळं जमवलं आणि आयपीएल सारखं वाटेल, असा माहौल तयार केला. एका मोबाईल ऍपवरुन मॅचही या महाठगांनी लाईव्ह चालवल्या.
Can’t stop laughing. Must hear this “commentator” pic.twitter.com/H4EcTBkJVa
— Harsha Bhogle (@bhogleharsha) July 11, 2022
गावातल्याच लोकांना भाड्याने आणलं जायचं. त्यांना चारशे रुपये देऊन संपूर्ण 20-20 सामना खेळवला जायचा. रशियातीलच एक व्यक्ती रशियातूनच हे सगळं मॉनिटर करत होता. खेळाडू, अंपायर, असं सगळं नकलीच तयार करुन परदेशातील प्रेक्षकांना गंडवण्याचा हा प्रकार अखेर उघडकीस आलाय. यात चक्क हर्षा भोगले सारखा आवाज काढणाऱ्या एका व्यक्तिलाही कॉमेन्ट्री करण्यासाठी खास तैनात करण्यात आलं होतं. हे कळल्यानंतर खुद्द हर्षा भोगले यांनाही हसू आवरलं नाहीय.
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची सध्या कसून चौकशी सुरु आहे. कुणाच्या आशीर्वादानं हा सगळा प्रकार सुरु होता, याचा तपास आता गुजरात पोलिसांकडून केला जातोय.