ट्रेनने यायचा आणि बुलटेवरुन जायचा, महागड्या मोटारसायकल चोराचा पोलिसांकडून पर्दाफाश
कल्याण पश्चिमेकडील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातून एक बुलेट चोरीला गेली होती. गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीच्या साह्याने कल्याण गुन्हे शाखेच्या टीमने आरोपीला डोंबिवली जवळील कोळेगाव परिसरात ताब्यात घेतले.
कल्याण : कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात पार्क केलेल्या बुलेट गाड्या चोरून त्या थेट पुणे, लातूर, सोलापूर, निलंगे परिसरात विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभम पवार असे अटक करण्यात आलेल्या 19 वर्षीय आरोपीचे नाव आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीला अटक केली आहे. शुभम हा लातूरचा राहणारा असून, तो ट्रेनने लातूर ते कल्याण प्रवास करायचा. नंतर कल्याण ठाकुर्ली डोंबिवली परिसरात हँडल लॉक नसणाऱ्या बुलेट गाड्या चोरून लातूरला न्यायचा. त्यानंतर त्या गाड्याची विक्री करून मौजमस्ती करायचा. पोलिसांनी आरोपीकडून 13 मोटर सायकल जप्त केल्या असून, आरोपीने अजून किती गाड्या चोरल्या याचा तपास सुरू केला आहे.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी अटक
कल्याण पश्चिमेकडील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातून एक बुलेट चोरीला गेली होती. गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्हीच्या साह्याने कल्याण गुन्हे शाखेच्या टीमने आरोपीला डोंबिवली जवळील कोळेगाव परिसरात ताब्यात घेतले.
या आरोपीकडे चौकशी केली असता आरोपीचे आई वडील भिंवडीतील रांजनोली परिसरात राहत असून, आरोपी लातूरमध्ये राहतो. दर 15 दिवसानंतर आरोपी रेल्वेचा प्रवास करुन कल्याण स्टेशनला उतरायचा.
हँडल लॉक नसलेल्या गाड्या चोरायचा
कल्याण ठाकुर्ली डोंबिवली स्टेशन परिसरात हँडल लॉक नसलेल्या बुलेट गाड्या शोधायचा. त्यानंतर त्या गाड्या चालू करून बाय रोड लातूरपर्यंत पोहोचायचा. त्या गाड्या पुणे, लातूर किंवा सोलापूर या ठिकणी कमी किमतीत विक्री करायचा.
गाड्या विकून आलेल्या पैशांवर मौजमस्ती करायचा
मिळालेल्या पैशांवर हा आोरपी मौजमजा करायचा. पैसे संपले की पुन्हा आपले लक्ष्य गाठण्यासाठी तो मुंबईच्या दिशेने निघायचा. हा त्याचा धंदा बनला होता. पोलिसांच्या तपासात स्टेशन परिसरातून त्याने जवळपास 13 गाड्या चोरल्या.
पोलिसांनी या सर्व गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.