Farmer Suicide : पावसाच्या पाण्यात शेती वाहून गेली, निराश शेतकऱ्याची आत्महत्या, आठवडाभरातील तिसरी घटना
रविंद्रने सेवा सहकारी संस्थेतून शेतीकरीता 70 हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. कर्जातून त्याने शेतात कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. मात्र हा हंगाम कोसळत्या धारा आणि पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने रविंद्र नैराश्येत होता.
चंद्रपूर : राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरु आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. पुराच्या पाण्यात अनेक संसार, घरे, शेती वाहून गेले आहे. शेतीच्या नुकसानी (Loss)मुळे पीककर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरु आहे. चंद्रपूरमध्ये बुधवारी आणखी एका शेतकऱ्याने पीक वाहून गेल्याने आणि कर्जा (Debt)च्या चिंतेतून मृत्यूला कवटाळले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील एका शेतकऱ्याने कीटकनशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविंद्र नारायण मोंढे (45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या
रविंद्रने सेवा सहकारी संस्थेतून शेतीकरीता 70 हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. कर्जातून त्याने शेतात कापूस व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. मात्र हा हंगाम कोसळत्या धारा आणि पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने रविंद्र नैराश्येत होता. पीक वाहून गेल्याने कर्ज कसे फेडाये हा मोठा प्रश्न रविंद्रसमोर होता. याच विवंचनेतून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. कीटकनाशक प्राशन करुन रविंद्रने आपली जीवनयात्रा संपवली. जिल्ह्यातील या आठवड्यातील ही तिसरी आत्महत्या आहे. जिल्ह्यात 25 जुलै रोजी वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथे प्रफुल्ल भोयर (35) या तरुण शेतकऱ्याने कीटक नाशक पिऊन आत्महत्या केली होती. तर 23 जुलै रोजी राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथे अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. (Farmer commits suicide by drinking poisonous medicine due to financial hardship in Chandrapur)