Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेताच्या बांधावर खोदकाम, अचानक वाद उफाळला, दोन शेतकरी आमनेसामने, थेट गोळीबार, लातूरमधील भयानक घटना

शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्याची घटना लातूरमध्ये समोर आली आहे.

शेताच्या बांधावर खोदकाम, अचानक वाद उफाळला, दोन शेतकरी आमनेसामने, थेट गोळीबार, लातूरमधील भयानक घटना
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 8:59 PM

लातूर : शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यावर गोळ्या झाडल्याची घटना लातूरमध्ये समोर आली आहे. शेताच्या बांधावरील खोदकाम करताना झालेल्या वादातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यावर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. संबंधित घटना ही लातूर जिल्ह्यातील नागलगाव येथे घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

शेतकरी सतीश गुडसुरे हे त्यांच्या शेतात काम करत होते. ते शेताच्या बांधावर खोदकाम करत होते. यावेळी शेजारचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी बांधाचे खोदकाम करण्याच्या कारणावरुन वाद घातला. याच वादातून शिवाजी पाटील याने थेट खिशातून रिव्हॉल्वर काढली. त्याने आधी शेतकऱ्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. पण वाद जास्त चिघळला. त्यातून त्याने रागाच्या भरात सतीश गुडसुरे यांच्या दिशेला गोळीबार केला. आरोपीने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने सतीश गुडसुरे हे बचावले. पण त्यांचे भाऊ रमेश गुडसुरे यांच्या पाठीला गोळी लागली. यामध्ये ते जखमी झाले.

पोलिसांची घटनास्थळी धाव

गोळीबाराची खबर गावात धडकली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. जखमी रमेश गुडसुरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान संबंधित घटनेची माहिती उदगीर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. सतीश गुडसुरे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी वेळेचा विलंब न करता तातडीने रुग्णालय गाठले. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

अखेर फिर्यादी सतीश यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर उदगीर पोलिसांनी आरोपी शिवाजी पाटील याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली रिव्हॉल्वरही जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास उदगीर पोलीस करत आहेत. तसेच गुडसुरे बांधवांना न्याय मिळावा, अशी मागणी काही गावकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा :

‘कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार’ म्हणत पिस्तूल हातात घेऊन व्हिडीओ, पोलीस शिपायाचं अखेर निलंबन

कापूर, अगरबत्ती लावून वडिलांचा मृतदेह 3 दिवस घरात, मग मुलीचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला, विरारमधील गूढ कसं उकललं?