जुन्नर : शेतकरी तरुणांची लग्नाची मोठी सामाजिक समस्या सध्या ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत आहे. प्रत्येक गावात लग्न रखडलेले 30 ते 40 वयोगटांतील किमान 25-30 तरुण सध्या आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये लग्नासाठी विकत मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्नर तालुक्यातील एका 32 वर्षीय शेतकरी तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या तरुणाने या रॅकेटमध्ये सामील असलेल्या संबंधित एजंट आणि तरुणीसह एका महिलेबाबत आळेफाटा पोलिसांना लेखी तक्रार केली. परंतु फसवणूक झालेल्या तरुणाचे लग्न आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न झाल्याने पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांच्याअशा भूमिकेमुळे एजंटांचे प्रस्थ वाढत चालले आहे.
जुन्नर तालुक्यातील एका गावातील एका तरुणाला शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. मुलगी मिळावी म्हणून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला पैसे दिल्यास मुलगी पाहुण देतो असे सांगितले. त्या व्यक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला. त्या एजंटने तरुणाला नाशिक जिल्ह्यातील एका गावात मुलगी दाखवली. मुलीला वडील नसून आई आजारी असल्याने आम्हाला मुलीचे लग्न करायचे असल्याचे सांगितले.
तरुणाला सांगण्यात आले की, तू शेतकरी असल्याने तुला मुलगी मिळणार नाही. तू ह्या मुलीशी लग्न करून टाक मुलीच्या आईला दोन लाख देऊन टाकू. त्या एजंटने आळंदी येथे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित तरुणाने एजंटला एक लाख रुपये दिले. 18 मे रोजी आळंदी येथील एका मंगलकार्यालयात थाटामाटात लग्न झाले. यावेळी मुलीला अडीच तोळे सोन्याचे दागिने घालण्यात आले आणि उर्वरित एक लाख सबंधित एजंटकडे देण्यात आले.
लग्नानंतर देवदर्शन, सत्यनारायण महापूजा आणि इतर धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर मुलीला नाशिक येथे मावशीकडे सोडण्यात आले. त्यानंतर 25 तारखेला तरुणाने पत्नीला फोन करून कधी येते असे विचारले असता मुलीने मला नांदायचे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणाने एजंटला प्रत्यक्ष भेटून घडलेली हकीकत सांगितली. यावेळी एजंटने संबधित तरुणी आणि तिची साथीदार महिला माझा फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची फसवणूक जुन्नर तालुक्यात आणि संगमनेर जिल्हा अहमदनगर येथेही झाल्याचे त्याला कळले.
जुन्नर तालुक्यातील तरुणाशी लग्न केल्यानंतर तरुणीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात 23 मे रोजी लग्न करत एका तरुणाची फसवणूक केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने ही फसवणूक करणारी टोळी असल्याचे संबंधित तरुणाच्या लक्षात आले. हे एजंट आणि बनावट लग्न करणारी तरुणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजले.
या तरुणाने आपल्या फसवणुकीबाबत लेखी तक्रार आणि लग्नाचे पुरावे घेऊन 29 मे रोजी आळेफाटा पोलीस ठाणे गाठले, पोलिसांनी तरुणाचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, हे लग्न आळेफाटा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाले नसल्याने यावर कोणतीही कार्यवाही करता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्या तरुणाला वधूही मिळाली नाही आणि त्याचे दोन लाख रुपये वधूच्या अंगावर घातलेले अडीच तोळे सोनेही गेले आहे.