घरात पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी घराबाहेर पडले, पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक नदीत वाहून गेले
रत्नागिरीच्या चिपळून तालुक्यात तर प्रचंड विदारक वास्तव बघायला मिळत आहे. या सगळ्या घटना ताज्या असताना रायगडच्या कर्जत तालुक्यातील दामत येथून काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे
रायगड : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा प्रचंड धुमाकूळ बघायला मिळतोय. कोकणात तर अक्षरश: महापूर आला आहे. मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे. महाड शहराचा संपर्क तुटला आहे. रत्नागिरीच्या चिपळून तालुक्यात तर प्रचंड विदारक वास्तव बघायला मिळत आहे. या सगळ्या घटना ताज्या असताना रायगडच्या कर्जत तालुक्यातील दामत येथून काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. दामत गावात नदीच्या पुरात बाप-लेक वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटनाही दामत येथे आज (22 जुलै) सकाळी घडली. मृतक 40 वर्षीय वडीलाचं नाव इब्राहिम मुनियार असं होतं. तर पाच वर्षीय मुलीचं नाव झोया मुनियार असं आहे. घरात पाणी शिरलं म्हणून दोघं बाप-लेक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहून गेले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोकणात पावसाचा हाहा:कार
कोकणात विविध भागात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण शहरात सर्वाधिक हाहा:कार पाहायला मिळत आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. एमआयडीसीत काही कर्मचारी अडकले आहेत. ते भुकेने व्याकूळ झाले आहेत. तर घरात पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी अनेक नागरिकांनी घराच्या छताचा आश्रय घेतला आहे. चिपळून बस स्टँडमध्ये एक गरोदर महिला अडकल्याची माहिती देखील मिळत आहे. या भयानक परिस्थितीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संध्याकाळी चिपळून शहरात बचाव पथकाची एक टीम दाखल झाली आहे. बचाव पथकाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
महाड शहराचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे महाड शहराचा देखील संपर्क तुटला आहे. संपूर्ण शहराला पुराने वेढलं आहे. पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे. महाड शहरात वीज, मोबाईल नेटवर्कही बंद झालं आहे.
संबंधित बातम्या :
महाड शहराचा संपर्क तुटला, मुंबई-गोवा महामार्ग बंद, वीज-मोबाईल नेटवर्क बंद