आधी मुलगा नाही म्हणून मुलगा दत्तक घेतला, मग दत्तक पुत्रासह विहिरीला जवळ केले, कारण काय?
वंशाला दिवा नव्हता म्हणून नातेवाईकाकडून मुलगा दत्तक घेतला. सर्व काही सुरळीत जीवन सुरु होते. पण अचानक पित्याच्या मनात भलतेच आले अन् दत्तक पुत्रासह जे केले त्याने जिल्हा हादरला.
मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव : पोटी एक मुलगी जन्माला आली असताना केवळ वंशाला दिवा हवा, या मानसिकतेतून नात्यातील मुलगा दत्तक घेतला. पण डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. यामुळे आर्थिक विवंचनेतून त्याच वंशाच्या दिव्याला पोटाशी कवटाळून विहिर जवळ केली. सात वर्षाच्या मुलासह पित्याने अजंग शिवारातील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. यशवंत लक्ष्मण हिरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. आर्थिक विवंचनेतून हिरे यांनी मुलासह जीवन संपवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने संपूर्ण मालेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कर्जबाजारीपणामुळे टोकाचा निर्णय
हिरे यांचा पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय होता. जनावरांना लागणारे बिअरखाद्य घाऊक बाजारभावाने खरेदी करुन आपल्या पिकअप वाहनातून कसमादेतील खेडोपाडी जाऊन विक्री करायचे. मात्र त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत हिरे होते. याच कारणातून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
हिरे यांच्या कुटुंबात वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुलगी होती. मात्र मुलगा नसल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी एका नातेवाईकाकडून मुलगा दत्तक घेतला होता. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी मुलाला वाढवले होते. मात्र मुलगा फार मस्तीखोर असल्याने घरच्यांना खूप त्रास द्यायचा. यामुळे यशवंत कामानिमित्त खेडोपाडी फिरत असताना त्याला सोबत घेऊन जायचे.
नेहमीप्रमाणे पिता-पुत्र धंद्यासाठी बाहेर पडले ते परतले नाही
गुरुवारी सकाळी पिता-पुत्र नेहमीप्रमाणे पशुखाद्य विक्रीसाठी घराबाहेर पडले. मालेगाव शहराजवळील मनमाड चौफुली येथून त्यांनी पशुखाद्य गाडीत भरल्यानंतर अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ गाडी उभी केली. मग मुलासह यशवंत यांनी विहिरीत उडी घेवून जीवन संपवले.
पिकअप वाहन पाहून नागरिकांनी पोलिसांना बोलावले
दरम्यान, बराच वेळ झाला तरी या भागात पिकअप उभी असल्याने काही नागरिकांनी अंजग येथील पोलीस पाटील यांना कल्पना दिली. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता बाजूलाच असलेल्या विहिरीजवळ चपलांचे जोड दिसून आले. यामुळे मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत याठिकाणी विहिरीत शोध घेतला असता यशवंत हिरे आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह मिळून आला.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. रात्री अकरा वाजता उशिरा पिता-पुत्रावर आघार येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार पिकअपमध्ये चिठ्ठी मिळून आली असून, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.