पुण्यात आयटी कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर सहकाऱ्याचाच चॉपरने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
मंगळवारी सायंकाळी शुभदा कार्यालयातून घरी जाण्यासाठी पार्कींगमध्ये गाडी काढण्यासाठी उभ्या होत्या. ज्यावेळी त्या गाडी बाहेर काढत होत्या. तेव्हा तेथे त्यांचा कार पार्कीग दरम्यान पैशावरुन वाद झाला.
पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत एका महिला सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी कंपनीच्या पार्किंग एरियात घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभदा कोदारे ( २८ वर्षे ) यांचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी शुभदा कोदारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर कोदारे यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शुभदा शंकर कोदारे ( वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज ) यांच्या हत्येच्या प्रकरणात कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक झाली आहे. कृष्णा याने शुभदा हिच्यावर इतका जोरात वार केला की त्यात त्यांचा उजवा हात निखळला.त्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. ही घटना रामवाडी येथील डब्ल्यु. एन. एस. या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडली.
असा झाला हल्ला
शुभदा कोदारे या मुळच्या कराड येथील रहिवासी आहेत.त्या रामवाडी येथील डब्ल्यु. एन. एस. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाऊंटट म्हणून कामाला होत्या. त्यांच्याच विभागात काम करणारा त्यांचा सहकारी कृष्णा कनोजा याचे त्यांच्याशी उधारीच्या पैशांवरुन वाद झाले होते. कंपनीतून सुटल्यानंतर त्या कंपनीच्या पार्किंगमध्ये आल्या. त्याचवेळी कनोजा याने त्यांना गाठले. जाब विचारत त्यांवर कोयत्याने वार केला. त्यांच्या उजव्या हातावर झालेला हा वार इतका वेगाने केला होता की त्यात त्यांचा हातच तुटला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला.येरवडा पोलिसांनी कृष्णा कनोजा याला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.