नवी दिल्ली : जावयाने सासूला दोन गोळ्या मारून ठार केले. एक गोळी डोक्यावर, तर दुसरी गोळी खांद्यावर लागली. आरोपी छोटन हा गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. पाच वर्षांपूर्वी त्याने आईची हत्या केली होती. छोटनच्या पत्नीने सांगितले की, तिची आई शेतावर गेली होती. तेवढ्यात मोठ्याने आवाज आला. शेतात पोहचली तेव्हा तिचा पती पळून जात होता. तिच्या आईची हत्या झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटन हा पत्नीला आपल्याकडे परत घेऊन जाण्यासाठी आला होता. सासूने त्याला चांगलेच सुनावले. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून छोटनने तिच्यावर गोळीबार केला. छोटन हा दरभंगा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रतन पट्टीचा रहिवासी आहे. २०१८ मध्ये त्याने स्वतःच्या आईचा खून केला होता. आईचा मृतदेह टंकीत फेकून तो पसार झाला होता.
छोटनच्या बहिणीने आईच्या हत्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती. त्यानंतर छोटन फरार झाला. त्यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली. तिथं जाऊन छोटन पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी येत होता. एका वर्षापूर्वी २०२२ मध्ये छोटन चोरी करून सासूच्या घरी शिरला होता. सासू आणि बायकोवर चाकूने वारही केला होता. त्याचीही तक्रार पोलिसांत आहे.
मृतक महिला गायत्री देवीने आपल्या दुसऱ्या मुलीचे लग्न २०१५ ला रतन पट्टीतील छोटनसोबत लावून दिले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. छोटनने २०१६ मध्ये घर बनवले. पैशावरून त्याचा आईसोबत वाद झाला. त्यावरून त्याने आपल्या आईचाच खून केला होता.
पत्नीच्या वडिलांनी दरभंगा येथे जाऊन एसपी कार्यालयात तक्रार केली. कुंडवा चैनपूरचे ठाणेदार रमन कुमार यांनी तपास सुरू केला. एसपी कांतेश मिश्रा यांनी सांगितले की, ही घटना रविवारी घडली. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.