Apple Air Tag सुविधेचा वापर करुन एक्स गर्लफ्रेंडची करीत होता हेरगिरी, देशातील पहिलेच प्रकरण, एफआयआर दाखल
आयफोन कंपनी apple चे एअर टॅग लोकांच्या खाजगी वस्तूंना शोधण्यासाठी डीझाईन केले होते. परंतू लोक त्याचा वापर करीत आहेत.
नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : Apple च्या आयफोनमध्ये असलेल्या अत्याधुनिक एअर टॅग ( Apple Air Tag ) सुविधेचा गैरवापर केल्याचा देशातील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. एअर टॅगचा वापर महिलेवर पाळत ठेवण्यासाठी केल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणातील पीडीत महिला ही आरोपीची पूर्वीची मैत्रिण असल्याचे उघडकीस आले आहे. अशाप्रकारे माजी गर्लफ्रेंडची प्रायव्हसी भंग केल्याप्रकरणात या तरुणावर आयटी कायदा आणि भारतीय दंड विधान संहिते अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या फोनचा वापर अशा प्रकारे हेरगिरीसाठी झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी हा या महिलेच्या पूर्वी मित्र होता. महिलेने आरोप केला की आरोपीने एअरटॅगचा वापर करीत तिचे लोकेशन आणि फोन कॉल देखील गुपचुप रेकॉर्ड केले आहेत. अहमदाबाद सायबर पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 ड ( पाठलाग करणे ) तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायदा अधिनियम कलम 66 ई ( शारीरिक गोपनीयतेचे उल्लंघन करणे ) अनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईलमध्ये आला अलर्ट
तक्रारदार महिलेला मे महिन्यात प्रथम तिच्या आयफोन 13 प्रो मॅक्सवर एक अलर्ट मॅसेज आला होता. ज्यात तिचा एअरटॅग पाठलाग करीत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा ही महिला तिच्या घरातून कामाला जात होती, तेव्हा तिच्या आयफोन पुन्हा तसाच मॅसेज आला. 29 ऑगस्ट रोजी कामाला जाताना पुन्हा तसाच संदेश आला. ज्यावेळी तिने फोनमध्ये क्लिक केले तेव्हा तिची लोकेशन एअरटॅगच्या मालकाला दिसत आहे असा मॅसेज आल्याने ही महिला हादरली.
महिलेला असा संशय आला
तक्रारदार महिला रियल इस्टेट क्षेत्राशी जोडलेली असून तिची कोणाकडून तरी पाळत होत असल्याचा तिला संशय आल्याने तिन जुलै महिन्याच्या सुरुवातीला सायबर सेलकडे तक्रार केली. अशा प्रकारचा अलर्ट तिचा ड्रायव्हर आणि मुलीलाही आला होता. त्यानंतर तिने डीव्हाईसचा शोध घेण्यासाठी तिच्या कारला सर्व्हीस स्टेशनला नेले. त्यानंतर पोलिसांना ड्रायव्हरच्या सीटच्या खाली एअर टॅग चिकटविल्याचे आढळले. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
2021 मध्ये एअरटॅग लॉंच झाले होते
एप्पलने एअरटॅगची सुविधा साल 2021 मध्ये लॉंच केली होती. त्यानंतर या सेवेचा दुरुपयोग होत असल्याचे उघडकीस आले होते. ज्यानंतर साल 2022 मध्ये Apple ने आपल्या वेबसाईटवर एक सार्वजनिक सूचना जारी केली होती. ज्यात म्हटले होते की एअर टॅग लोकांच्या खाजगी वस्तूंना शोधण्यासाठी डीझाईन केले होते. परंतू लोक त्याचा वापर अन्य व्यक्तींच्या संपत्तीला ट्रॅक करण्यासाठी करीत आहेत. आम्ही आमच्या उत्पादनाचा असा गैरवापर करण्याच्या प्रकाराचा कडक शब्दात निषेध करीत आहे असे कंपनीने म्हटले होते.