दिवा-वसई मार्गावर ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटकात राडा, आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण; कारण काय?
रेल्वे रुळावरच त्यांनी स्वतःच्या गाड्या देखील उभ्या केल्या. या पाच ते सात जणांची समजूत काढण्यास आलेल्या रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्याला देखील यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली.
दिवा : दिवा वसई रेल्वे मार्गावर मेगाबलॉक दरम्यान ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या फाटकात रेल्वे रुळाचे काम सुरू होते. या दरम्यान गेटमनला जबरदस्तीने गेट उघडण्यास लावत गोंधळ घालून रेल्वे पोलीस कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच जणांना डोंबिवली जीआरपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहित विश्वकर्मा, साजन सिंग, गौरव सिंग, संतोष यादव, विल्सन डिसोझा अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत.
मेगाब्लॉक दरम्यान दुरुस्तीचे काम सुरु होते
26 जानेवारी रोजी रात्री 1 ते 4 च्या सुमारास दिवा वसई रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान मार्गावर ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकांमधील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
फाटक न उघडल्याने रेल्वे रुळावरच मांडला ठिय्या
याच सुमारास पाच ते सात अज्ञात इसम या ठिकाणी आले. त्यांनी रेल्वे फाटक उघडण्याचे गेटमनला सांगितले. मात्र गेटमनने दुरुस्ती सुरू असल्याने गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे या पाच ते सात जणांनी रेल्वे रुळावरच ठिय्या मांडत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
समजूत काढायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण
रेल्वे रुळावरच त्यांनी स्वतःच्या गाड्या देखील उभ्या केल्या. या पाच ते सात जणांची समजूत काढण्यास आलेल्या रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्याला देखील यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली.
पोलिसांकडून पाच जणांना अटक
सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अखेर याप्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आणखी एक महिला आणि पुरुष आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध सुरू घेत असल्याची माहिती डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.