पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहून गेले, थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद
गेल्या चार वर्षांपासून या पुलावरुन पाणी वाहत आहे. अनेक दिवसांपासून पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सोलापूर / सागर सुरवसे (प्रतिनिधी) : पूल ओलांडताना पाच ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून (Drown) गेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील बार्शी (Solapur Barshi) तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावात घडली आहे. पुलावरुन नागरिक वाहून जातानाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे. वाहून गेलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
निखिल महादेव कुंभार, पोपट बाबुराव घाडगे, अनुसया पोपट घाडगे, दिलीप ताकभाते आणि प्रविण भारत क्षीरसागर अशी वाहून गेलेल्या नागरिकांची नावे आहेत. या सर्व नागरिकांचा शोध प्रशासनाकडून सुरु आहे.
अशी चूक तुम्ही कधीही करु नका !#SolapurBarshi #Flood #PeopleDrown pic.twitter.com/7BC4m1nIuB
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2022
पुलाची उंची वाढवण्याची मागणी
गेल्या चार वर्षांपासून या पुलावरुन पाणी वाहत आहे. अनेक दिवसांपासून पुलाची उंची वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावकऱ्यांनी तहसीलदार सुनील शेरखाने यांची भेट घेत वारंवार ही मागणी केली. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने अखेर दुर्घटना घडली.
पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
यापूर्वीही गाड्या वाहून जाणे, नागरिकांच्या जिवितास धोका झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काल झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पिंपरी येथील पुलावरून साधारण तीन ते साडेतीन फूट पाणी वाहत होते. या पाण्यातून पूल ओलांडताना पाच गावकरी आज वाहून गेले.
वर्षातून सुमारे सहा महिने सतत पूल पाण्याखाली असतो. यामुळे गावाशी होणारे दळणवळण स्थगित होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होते. गावकऱ्यांच्या वतीने पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत आहे.