नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागात पडणारे दरोडे शहरी भागात पडू लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहर हद्दीत अंबड-सातपुर लिंक परिसरात असलेल्या बच्चू कर्डिले यांच्या घरावर दरोडा टाकत त्यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये घडलेली ही घटना शहर हादरून टाकणारी ठरली आहे. दोन दिवस उलटून गेले संशयित आरोपींचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बच्चू कर्डिले यांच्या खुनाचा उलगडा व्हावा याकरिता नाशिक शहर पोलीसांनी पाच पथके तयार केली असून खुनाचा तपास केला जात आहे. बच्चू कर्डिले यांच्या चुलत भावाच्या मुलाचा दुसऱ्या दिवशी विवाह होता, त्याकरिता हळदी समारंभाला संपूर्ण कुटुंब गेले होते, त्यामध्ये बच्चू कर्डिले यांना बरं नसल्याने ते घरीच थांबले होते. त्याच दरम्यान दरोडेखोरांनी बच्चू कर्डिले यांच्या घरावर दरोडा टाकत सोने आणि रोकड लंपास करण्यास सुरुवात केली होती त्याच दरम्यान बच्चू कर्डिले यांनी विरोध दर्शविल्याने त्यांचा खून झाल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली होती.
नाशिक शहरातील अंबड वसाहतीत एक्स्लो पॉईंट परिसरात राहणाऱ्या बच्चू कर्डिले यांचा खून झाला होता, त्यावेळी त्यांच्या घरातील लाखों रुपयांचे दागिने चोरीला गेले होते.
बच्चू कर्डेल यांच्या चुलत भावाच्या मुलाची हळद समारंभ असल्याने घरातील सर्व कुटुंब बाहेर गेले होते. हीच संधी साधून दरोडेखोरांनी बच्चू कर्डेल यांच्या डोक्यात हत्याराणे वार करून जीवे ठार मारले.
यावेळी घरातील कोठीत दागिने आणि लाखों रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती, ती देखील दरोडेखोरांनी लंपास केली होती.
यामध्ये चोरांना जर चोरी करायची होती तर बच्चू कर्डेल यांना जीवे ठार का मारले ? असा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत असले तरी अद्यापही संशयित हाती लागत नाहीये.
शहर पोलीसांनी जवळपास पाच पथके तयार करून तांत्रिक आधार घेत तपास सुरू केला आहे, श्वान पथकाच्या माध्यमातून तपास केला जात असून दोन दिवस उलटले तरी अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही.