Delhi Drowned : मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू; दिल्लीतील दुर्दैवी घटना
यमुना नदीत पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत अथक प्रयत्न करुन अग्नीशमन दलाने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सनलाइट कॉलनी परिसरात रविवारी मूर्ती विसर्जना (Immerse)साठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डीएनडी उड्डाणपुलाखालून यमुना नदीत हे पाचही जण बुडाले (Drowned) आहेत. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्व मृत नोएडातील सालारपूर गावचे रहिवासी होते. रविवारी हे सर्वजण आपापल्या गावातील लोकांसह श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सनलाइट कॉलनी परिसरात गेले होते. अंकित, लकी, ललित, बिरू आणि ऋतुराज उर्फ सानू अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यमुना नदीत पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत अथक प्रयत्न करुन अग्नीशमन दलाने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील.
मथुरेत मानसी गंगा कुंडात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
मथुरेतील प्रसिद्ध गोवर्धन येथील मानसी गंगा कुंडात एका 18 वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुण मानसी गंगा कुंडात पवित्र स्नान करायला गेला होता. मयत विद्यार्थी दिल्लीतील रहिवाशी आहे. तो दिल्लीतील मंगोलपुरी येथील एका कोचिंग सेंटरच्या 48 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधून गोवर्धनला फिरायला गेला होता. हा ग्रुप शनिवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशाच्या मथुरा नगरीत दाखल झाला होता. रविवारी सकाळी मुकुट मुखबिंदू मंदिराला भेट दिल्यानंतर ते पवित्र तलाव मानसी गंगा कुंड येथे पोहोचले होते. तेथे आंघोळ करत असताना तीन विद्यार्थी खोल पाण्यात गेले. स्थानिक नागरिकांनी त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश मिळविले. मात्र एका विद्यार्थ्याचा बुडून अंत झाला. (Five youths who went to immerse idols in Delhi drowned)