नाशिकमध्ये दोन गटात राडा ! शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले, हवेत गोळीबार कुणी केला?
नाशिकच्या देवळाली गावात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्यानं खळबळ उडाली असून याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवळाली गाव परिसरात गुरुवारी सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या चर्चेत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील लवटे याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या चालू आहे. उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा शिंदे गटाचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्निल लवटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटेंचा स्वप्नील लवटे हा पुतण्या देखिल आहे
19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी अध्यक्ष निवड केली जाणार होती. याच दरम्यान हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नाशिक शहरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस पथके देवळाली गावाकडे रवाना झाली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये सुरुवातील राडा झाला होता, याच दरम्यान शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा असलेल्या स्वप्नील लवटे याने राग आल्याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वप्नील लवटे याला पोलीसांनी अटक केली असून अधिकचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंद्राकांत खांडवी यांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी रात्री उशिरा तपास करत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यन्त देवळाली गाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.