माजी न्यायाधीशांना ऑनलाइन भामट्यांचा दणका, बँकिंग घोटाळ्यात बसला हजारोंचा फटका
. गेल्या काही महिन्यात ऑनलाइन चोरांचा धुमाकूळ वाढला असून त्यामुळे निष्पाप, सामान्य नागरिकांची मात्र मोठी फसवणूक होत आहे. आता असाच एक ऑनलाइन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची ऑनलाइन घोटाळ्यात फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई | 22 डिसेंबर 2023 : काही दिवसांपूर्वीच एका माजी पोलिस अधिकाऱ्याला ऑनलाइन घोटाळ्याचा फटका बसला होता. तर अभिनेता आफताब शिवादासानी याने ऑनलाइन फ्रॉडमध्ये मेहनतीची कमाई गमावली. गेल्या काही महिन्यात ऑनलाइन चोरांचा धुमाकूळ वाढला असून त्यामुळे निष्पाप, सामान्य नागरिकांची मात्र मोठी फसवणूक होत आहे. आता असाच एक ऑनलाइन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची ऑनलाइन घोटाळ्यात फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ( निवृत्त ) रमेश देवकीनंदन धानुका यांची ऑनलाइन बँकिंग घोटाळ्यात ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका (62) यांना 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईल फोनवर एक मेसेज आला होता. फोनवरील व्यक्तीने त्यांना पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितले. जर तुम्ही हे कार्ड अपडेट केले नाही, तर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते बंद होईल, असा इशारााही त्यांना देण्यात आला. त्यामुळे धानुका यांनी त्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्यांची वैयक्तिक माहिती भरली. मात्र तेथे असलेले सबमिट बटण दाबताच धानुका यांच्या खात्यातून थेट 49,998 रुपये कापले गेले.
त्यानंतर लगेचच एसबीआयच्या प्रतिनिधीने धानुका यांना फोन केला आणि तुमच्या खात्यातून जवळपास 50 हजार रुपये गेल्याचे त्यांना सांगितले. मात्र त्यानंतर धानुका यांनी आपण असे कोणतेही व्यवहार केले नसल्याचं सांगितले आणि लगेचच त्यांचा इंटरनेट बँकिंग आयडी ब्लॉक केला. त्यानंतर धानुका यांनी हेल्पलाइन क्रमांक 1930 वर फोन करून तक्रार नोंदवली आणि 28 नोव्हेंबर रोजी कुलाबा पोलिसांना लेखी निवेदन दिले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत एफआयआर नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.