हत्या करून अपघाताचा बनाव, 12 वर्षाच्या लढ्यानंतर आरोपींची निर्दोष मुक्तता
संजय पुन्हा 21 सप्टेंबर 2010 रोजी शिरोळ गावात सासरवाडीला गेला. त्यानंतर तो आपल्या घरी नांदगावला परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यानंतर त्यांना त्याच दिवशी 21 सप्टेंबर रोजी धक्कादायक माहिती मिळाली.
कल्याण : हत्या (Murder) करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव करत पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपींची पुराव्याअभावी सुटका (Rescued) करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील शिरोळ गावातील चार आरोपींची सबळ पुराव्याच्या अभावी जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीश शौकत गोरवाडे यांनी निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालात सरकारी पक्षाला आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे (Evidence) सादर करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवला.
शंकर मंग्या पिंगळा, यशवंत काळू भगत, काशिनाथ भाऊ गावंडा आणि अंत्या सोमा पारधी अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या वतीने ॲड. गोविंद निकम यांनी युक्तीवाद करत सदर प्रकरणाशी अटकेतील आरोपींचा कोणताही सहभाग नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारी वकील काय म्हणाले ?
या पार्श्वभूमीवर सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादात म्हटले की, मृत संजय सन्या बांगरे हा नांदगाव येथे शहापूर तालुक्यात आपल्या पत्नी छायासोबत राहत असताना कौटुंबिक कलहातून अनेकदा या दाम्पत्यामध्ये वाद व्हायचे. पत्नी छाया ही आपल्या माहेरी शिरोळ गावी निघून गेली.
मुलीला मारहाण केल्याचे छायाच्या वडिलांना रुचले नाही. पत्नीला घरी आणण्यासाठी गेल्यानंतर छायाच्या वडिलांनी जावई संजय बांगरे याला समज दिली. पुन्हा मुलीला मारु नको आणि आमच्या घरी येऊ नको, असे समजावले.
त्यानंतर संजय पुन्हा 21 सप्टेंबर 2010 रोजी शिरोळ गावात सासरवाडीला गेला. त्यानंतर तो आपल्या घरी नांदगावला परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यानंतर त्यांना त्याच दिवशी 21 सप्टेंबर रोजी धक्कादायक माहिती मिळाली.
नातेवाईकांच्या तक्रारीनुसार अटक केली, मात्र पुराव्याअभावी सुटका झाली
एका तरुणाचा मृतदेह खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकांदरम्यान आढळून आला होता. घटनास्थळी जाऊन पाहिले असता हा मृतदेह संजयचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह सापडल्यानंतर संजयच्या नातेवाईकांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला व अटकेची कारवाई केली होती. आता या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे ॲड. गोविंद निकम यांनी सांगितले.