Amaravati Accident : अमरावतीत पिकअप वाहनाला अपघात, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
आठवडी बाजारातून परत जात असताना या वाहनाला अपघात झाला. जखमींना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमरावती : अमरावतीच्या मेळघाटमध्ये पिकअप वाहनाला भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. तर 10 प्रवासी गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. आठवडी बाजारातून परत जात असताना या वाहनाला अपघात झाला. जखमींना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारणी तालुक्यातील मेळघाटातील सुसर्दा राणीगाव मार्गे आकोटला हे पिकअप वाहन चालले होते. घाटातून जात असताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. घाटातील रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे येथे अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात.
मेळघाटमध्ये रस्त्यांची वानवा
मेळघाट हा अमरावती जिल्ह्यामधील अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग आहे. अद्यापही हा भाग विकासापासून कोसो दूर आहे. या भागात चांगले रस्तेही नाहीत. खड्डेमय आणि कच्चे रस्ते असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात. तसेच या भागातील लोकांना दळणवळणासाठी वाहनांची सोयही नाही. यामुळे अनेक वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतात. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे तर कधी रस्त्यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून येथे अपघात घडत असतात. प्रशासनाचे या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ते आणि दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
आठवडाभरापूर्वी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात
आठ दिवसांपूर्वी मेळघाटमध्ये टेंबुरसोंडा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका क्रुझरला अपघात झाला होता. यामध्ये जवळपास 13 प्रवासी जखमी झाले होते, तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा मेळघाटात अपघाताची घटना घडली आहे. (Four businessmen killed, 10 passengers injured in pick-up vehicle accident in Amravati)