औरंगाबाद: वाळूज एमआयडीसी परिसरात बंद पडलेल्या फ्रीजचा वापर करत अवैधरित्या बायोडिझेलची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. औरंगाबाद पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Aurangabad crime branch police) मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावरील मराठवाडा ट्रक बॉडी बिल्डर या गॅरेजला लागून एटीएफ ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. या कंपनीत अवैधरित्या इंधनविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी दुपारी औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने कंपनीवर छापा मारला. यावेळी 16 हजार लिटर बायोडिझेल, एक ट्रक आणि इतर वस्तू असा 23 लाख 40 हजारांचा ऐवज जप्त केला. मागील महिन्यात याच कंपनीतून बायो डिझेलचा पंप महसूल विभागाने सील केला होता.
अवैधरित्या बायोडिझेल विक्री केल्याप्रकरणी पंपचाल सय्यद इरफान (40, रा. कैसर कॉलनी) व जमील कुरेशी (रा. बायजीपुरा), कामगार शेख इम्रान शेख उस्मान (रा. बायजीपुरा) व शेख रहीम शेख रशीद (रा. कैसर कॉलनी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अवैध बायो डिझेलच्या अड्ड्यावर 8 ऑगस्ट रोजी पोलिसांनी छापा मारला होता. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. विभागाने फक्त तो पंप सील केला होता. या पंपाला लागूनच दुसरा पंप सुरु करण्याचे धाडस आरोपींनी केले. या प्रकरणाची कुणकुण स्थानिक पोलिसांनाही कशी लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरातील या अवैध इंधन विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने छापा मारला. पोलीस, पुरवठा विभागाच्या निरीक्षक अनुराधा पाटील व गुवन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा लोखंडी टाक्यांमध्ये 16 हजार लीटर डिझेल भरलेले आढळले. तसेच 1 लाखाच्या टाक्या, डिझेल भरण्यासाठी आलेला ट्रक आणि इतर वस्तू जप्त करत पंप सील केला. अवैधरित्या इंधनाची विक्रीही मोठ्या हुशारीने केली जात होती. इंधन विक्रीसाठी आधी पंपसेट तयार केला होता. बंद पडलेल्या फ्रिजचा वापर करून त्याला पंपाचे हँडल बसवून त्यातूनच डिझेलची विक्री सुरु होती. पोलिसांनी छापा मारला तेव्हा एका ट्रकमध्ये बायोडिझेल भरणे सुरु होते. तीन मोठ्या टाक्यांतून डिझेल साठवून ठेवलेले होते.
जैविक कचऱ्यापासून बायोडिझेलची निर्मिती होते. डिझेलपेक्षा बायोडिझेल 20 ते 25 रुपयांनी स्वस्त आहे. डिझेल टाकल्यानंतर ठराविक लीटरच्या प्रमाणात 10 ते 20 टक्के बायोडिझेल टाकून वाहन वापर केला पाहिजे. मात्र बायोडिझेल विक्रेते डिझेल, बायोडिझेल व फ्युएल ऑइल या तिन्हींची भेसळ करून विकतात. बायोडिझेल पंपासाठीही पेट्रोलपंपाप्रमाणेच जिल्ह्याधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विविध विभागांच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. (Four held for illegal biodiesel trading in Aurangabad)
इतर बातम्या-
मित्राची हत्या करुन खिशातल्या पाचशे रुपयांची दारु आणली, गावभर बोंबलले ‘आज दो लोगो को टपका डाला’